अखेर कडवई स्थानकात थांबली पॅसेंजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST2021-09-08T04:37:47+5:302021-09-08T04:37:47+5:30
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे आंदोलनातून निर्माण झालेल्या स्थानकात पॅसेंजर ट्रेन थांबण्याची गेले अनेक दिवस ग्रामस्थांना प्रतीक्षा होती. ...

अखेर कडवई स्थानकात थांबली पॅसेंजर
आरवली :
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे आंदोलनातून निर्माण झालेल्या स्थानकात पॅसेंजर ट्रेन थांबण्याची गेले अनेक दिवस ग्रामस्थांना प्रतीक्षा होती.
मंगळवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता रत्नागिरीहून दिव्याला जाणारी पहिली पॅसेंजर अधिकृतरित्या या स्थानकावर थांबली आणि ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली. मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाडीला हार घालून गाडी दिव्याकडे रवाना झाली. यावेळी गाडीचे मोटरमन तसेच स्टेशन मास्तर यांनाही सन्मानित करण्यात आले.
कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २००८ सालापासून लढा उभारण्यात आला. याची दखल घेत २०१६ साली या स्थानकाला मंजुरी मिळाली. निधीअभावी या स्थानकाचे काम थांबले होते. स्थानकाचे काम पूर्ण झाले. मात्र, कोरोनामुळे गाडी थांबण्यासाठी ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागली. अखेर ७ सप्टेंबरपासून दिवा पॅसेंजरला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिला.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजता गाडी दाखल हाेताच ग्रामस्थांनी आनंदाेत्सव साजरा केला. यावेळी गाडीला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच गाडीचे लोको पायलट उदय पाटील, सहायक लोको पायलट समीर जाधव, स्टेशन मास्तर शुभम मेस्त्री यांनाही पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनसेचे उपतालुकाध्यक्ष नंदकुमार फडकले, रमेश किंजळकर, मोहन कुंभार, सुभाष धामनाक, संदीप इंजले, महेश निवळेकर, नवनाथ उजगावकर, सुरेश तुळसणकर, महेश बामणे, गणेश फडकले, दीपक फडकले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.