साकव मोजतोय अखेरच्या घटका
By Admin | Updated: November 11, 2014 23:24 IST2014-11-11T21:45:12+5:302014-11-11T23:24:19+5:30
मागणी प्रलंबित : हातदे निळंद ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाना हरताळ

साकव मोजतोय अखेरच्या घटका
पाचल : राजापूर तालुक्यातील पूर्व विभागात हातदे - मिळंद जोडणारा लोखंडी साकव अखेरच्या घटका मोजत असल्यामुळे त्यावरुन प्रवास करणे जिवावर बेतणार आहे. जिवघेण्या प्रवासाला जिल्हा परिषद जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मिळंद हातदे ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करुनसुद्धा कोणीच लक्ष न दिल्याने साकवाची दुरवस्था कायम आहे.
राजापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली जामदा खोऱ्यातील हातदे व मिळंद गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. या गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. दळणवळणाच्या दृष्टीने हे गाव खूपच मागासलेले आहे. त्याचा परिणाम गावातील इतरही गोष्टींवर झालेला दिसून येतो. नदीपलीकडील हातदे गावची व्यथा तर निराळीच आहे. या गावाला इतर गावांशी संपर्क करण्यासाठी हा मोडका पूलच जवळचा मार्ग आहे.
प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाची सोय या गावात उपलब्ध नसल्याने मिळंद गावच्या आयरे विद्यालयात, तर ज्युनिअर कॉलेजसाठी पाचलला, सिनीअर कॉलेजसाठी रायपाटण येथे याच मोडक्या पुलावरुन जावे लागते. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही हातदे गावच्या ग्रामस्थांना या पुलाचा वापर करावा लागतो. पर्यायी मार्ग खूपच लांब असल्याने हातदे गावचे ग्रामस्थ व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करत आहेत.
जिल्हा परिषद सदस्य याच गावचे आहेत. तरीसुद्धा हा विषय आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. राजापूर तालुक्यातील या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)