नाम फाऊंडेशनकडून विश्वनाथ भुतेंना शस्त्रक्रियेसाठी लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:38+5:302021-08-29T04:30:38+5:30
रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील विश्वनाथ पांडुरंग भुते (वय ४३, रा. गणेशवाडी, साखरीआगर) हे चिपळूण येथील पूरस्थितीनंतर त्या भागातील ...

नाम फाऊंडेशनकडून विश्वनाथ भुतेंना शस्त्रक्रियेसाठी लाखाची मदत
रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील विश्वनाथ पांडुरंग भुते (वय ४३, रा. गणेशवाडी, साखरीआगर) हे चिपळूण येथील पूरस्थितीनंतर त्या भागातील आपद्ग्रस्तांच्या मदतीचे काम करण्याकरिता गेले असता, त्यांना अपघात झाला होता. शस्त्रक्रिया करण्याकरिता त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. यासाठी नाम फाऊंडेशन संस्था पुढे आली. या संस्थेतर्फे भुते यांना लाखाची मदत करण्यात आली असून, नुकताच धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.
विश्वनाथ भुते चिपळूण येथील पूरग्रस्त भागाताील आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले असता, त्यांना गंभीर अपघात झाला होता. अपघातात त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. त्यांच्यावर चिपळूण येथील एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी शासनाने खर्च करावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली होती. अनेकांनी मदतीचा हातही पुढे केला. मात्र अपघात मोठा असल्याने हा खर्च मोठा आहे. याबाबबतची माहिती मिळताच नाम फाऊंडेशनने तब्बल १ लाख रककमेचा धनादेश भुते यांच्या उपचारासाठी सुपूर्द केला आहे. हा धनादेश नामच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन भुते यांच्याकडे सुपूर्त केला.
नाम फाऊंडेशन कोकण विभागात गेल्या चार वर्षांपासून जलसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. त्याचबरोबर पूर परिस्थितीतही या संस्थेने या भागात उल्लेखनीय कार्य केले आहे.
एसएमएस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. परमेश्वर गौड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, मुख्य समन्वयक गणेश थोरात, कोकण विभागीय समन्वयक समीर जानवलकर, गुहागर तालुका प्रतिनिधी हेमंत चव्हाण, चिपळूणचे नामचे सहकारी रमण डांगे, महेंद्र खेडेकर, महेंद्र कासेकर यांचेही मौलिक सहकार्य लाभले.
फोटो मजकूर : चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत करताना विश्वनाथ भुते यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी नाम फाउंडेशनतर्फे लाखाची मदत करण्यात आली. यावेळी संस्थेचे कोकण विभागीय समन्वयक समीर जानवलकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.