प्लॅस्टिक बॅगअभावी कोरोनाचा मृतदेह लपेटला चादरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:41+5:302021-05-23T04:30:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी कोट्यवधींची यंत्रणा उपलब्ध केली जात असतानाच मृत पावलेल्या रुग्णांना ‘बॉडी कव्हर ...

प्लॅस्टिक बॅगअभावी कोरोनाचा मृतदेह लपेटला चादरीत
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी कोट्यवधींची यंत्रणा उपलब्ध केली जात असतानाच मृत पावलेल्या रुग्णांना ‘बॉडी कव्हर बॅग’ उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यातील कामथे रुग्णालयात समाेर आला आहे. प्लॅस्टिक बॅग उपलब्ध नसल्याने एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चक्क चादरीतच लपटल्याचे विदारक चित्र समाेर आले आहे. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच, अनेकांनी याविषयीचा संताप व्यक्त केला.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत आहे. अशातच शासकीय रुग्णालयांमधील यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. त्यासाठी काही सामाजिक संस्था व काही व्यक्ती या यंत्रणेला अधूनमधून मदत करीत आहेत. काही महिन्यापूर्वी रोटरी, लायन्स व मुस्लीम सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कामथे उपजिल्हा रुग्णालयाला बेडसह कोविड सेंटरसाठी आवश्यक असलेले साहित्य दिले होते. त्यानंतर आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून या रुग्णालयाला सातत्याने विशेष सहकार्य होत आहे. अलसफा एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साफसफाईसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. असे असताना याच रुग्णालयात आता रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह झाकण्यासाठी आवश्यक असलेले ‘बॉडी कव्हर बॅग’ पुरवण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
कामथे उपजिल्हा रुग्णालयात ‘बॉडी कव्हर बॅग’चा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयाकडे ५० बॅगची मागणी केली असता मिळाले. अशातच रुग्णालयातील मृतव्यक्तींचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी रात्री एकही बॅग शिल्लक नव्हती. त्यामुळे या रुग्णालयातील एक मृतदेह चक्क चादरीत लपेटून ठेवण्यात आला होता. या प्रकाराचा गंभीरपणे दखल घेत आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली. त्यानुसार शनिवारी सकाळी कामथे रुग्णालयाला १० ‘बॉडी कव्हर बॅग’ देण्यात आले.
-------------------------------
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहास ‘बॉडी कव्हर बॅग’ उपलब्ध होत नसतील तर ती लोकप्रतिनिधींची नामुष्की आहे. जिल्हा रुग्णालयालाच या बॅग मिळत नसतील तर ते कामथे रुग्णालयाला कुठून देणार? अशावेळी दक्षता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या आमदारांनी तसेच खासदार व पालकमंत्र्यांनी याविषयी लक्ष घालणे गरजेचे आहे. तौक्ते वादळापेक्षा कोरोनाचे वादळ भयानक असून, त्यातील त्रुटी दूर करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी. अन्य भागांत या बाबी पुरवल्या जातात तर आपल्या जिल्ह्यात का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अजूनही गप्प का?
- संदीप लवेकर, चिपळूण