‘लाचलुचपत’ने रचला दारूड्याचा बनाव

By Admin | Updated: November 22, 2015 00:01 IST2015-11-21T23:23:47+5:302015-11-22T00:01:53+5:30

पाटीलच्या बनावगिरीने अधिकारी हैराण : भाऊबिजेसाठी गेला तेथेच तक्रारदारास बोलावले

'Lachchuchpat' made of dandruff made by | ‘लाचलुचपत’ने रचला दारूड्याचा बनाव

‘लाचलुचपत’ने रचला दारूड्याचा बनाव

अनंत जाधव ल्ल सावंतवाडी
काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाचे बिल काढण्यासाठी जशी बनवाबनवी तो करत असे, तशीच बनवाबनवी पैसे घेतानाही उपअभियंता राजन पाटील याने केली. मात्र, हीच बनवाबनवी त्याच्या अंगलट आली. रात्री उशिरा एखाद्याकडून पैसे घेतले तर कुणाला समजणार आणि कोण आपल्याला पकडणार, असेच काहीसे पाटील याचे झाले आणि अलगद तो लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. मात्र, त्याला पकडण्यासाठी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनाही दारूड्याचे नाटक करावे लागले. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले.
सावंतवाडी जिल्हा परिषद बांधकामचे उपविभागीय अभियंता राजन पाटील यांच्याकडे प्रताप काटकर हे निवृत्त झाल्यानंतर कार्यभार देण्यात आला होता. मात्र, यापूर्वी राजन पाटील याच्याकडे दोडामार्ग तालुक्याचा कार्यभार होता. तो तसाच ठेवण्यात आला होता. दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे झाली. मात्र, ही कामे वेळेत करून घ्यायची. पण बिलासाठी ठेकेदारांना नेहमी फिरवत ठेवायचे, हा पाटील याचा उद्योग होता आणि यालाच तक्रारदार अनिल गवस कंटाळला होता.
सात ते आठ महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या कामाचे बिल देण्यासाठी प्रत्येक कामामागे चार ते पाच टक्के द्यावी अशी पाटील याची मागणी होती. ही मागणी करत असताना हे पैसे बिल काढण्यासाठी आणि बिल काढल्यानंतर एक टक्का वेगळी रक्कम द्यावी लागत असे. आम्हाला सर्वांना भागवायचे असते, असे सांगून तो पैसे उकळत असे. चार लाखाच्या कामासाठी सोळा हजार आणि एका दुरूस्तीच्या कामासाठी दीड हजार ही पाटील याची मागणी होती. मात्र, ठेकेदाराने ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही हा अधिकारी बिल काढू देत नव्हता. ठेकेदारांना तो नेहमी बनवाबनवी करत असे. ठेकेदार दररोज दिवसभर एक लाखाच्या बिलासाठी सावंतवाडीतील जिल्हा परिषद बांधकामच्या कार्यालयाबाहेर पाटील याची चातकाप्रमाणे वाट बघत असत. पण तो आला तरी हा कागद अपुरा, तो कागद अपुरा असे सांगून त्यांना घालवत असे.
तक्रारदार अनिल गवस यांनी १७ नोव्हेंबरला लाचलुचपतकडे तक्रार दिली होती. त्यामुळेच १९ नोव्हेंबरला मी पैसे घेऊन येतो. तुम्ही कुठे भेटणार म्हणून ठेकेदार गवस यांनी पाटील याला संपर्क केला. तेव्हा पाटील याने येथेही बनवाबनवी केली. मी मांगेली येथे आहे. नंतर संपर्क केला तर मी दोडामार्गमध्ये आहे. सायंकाळी सावंतवाडीत येणार. सायंकाळी संपर्क केला तर मी सावंतवाडीत आहे. पण जरा कामात आहे. तुम्हाला फोन करतो, असे सांगत रात्री साडेदहा वाजेपर्यंत गवस यांना टोलवाटोलवी केली होती.
पैसे मोजून खिशात घालत असतानाच कारवाई
अनिल गवस याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या दिशेप्रमाणे राजन पाटील याच्याजवळ गेला. त्याचवेळी लाचलुचपतचे पोलीस निरीक्षक गवळी यांनी अंगावरचा शर्ट काढला. त्यांच्या जोडीला असलेल्या केणींनीही शर्ट काढत दारूड्याचे नाटक केले आणि पाटील यांच्या समोरून पुढे गेले. तर उपअधीक्षक मुकुंद हातोडे हे एका कर्मचाऱ्याच्या खांद्यावर हात टाकून बोलत उभे होते. ही संधी साधत अनिल गवस हा पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मागोमाग गेला आणि राजन पाटील याच्या गाडीजवळच जाऊन उभा राहिला. पाटील याने इकडे-तिकडे बघत पैसे घेऊन खिशात घातले. तोच लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी झडप घालत पाटीलच्या मुसक्या आवळल्या आणि कामगिरी फत्ते केली.
अन् १० वाजून २० च्या सुमारास फोन आला
कारवाईबाबत लाचलुचपतला संभ्रम असतानाच रात्री १० वाजून २० मिनिटांनी राजन पाटील यानेच तक्रारदाराशी संपर्क केला. यावेळी त्याने एवढ्या उशिरा संपर्क करण्यामागचे कारण म्हणजे रात्रीचे लाचलुचपतचे अधिकारी कोठून येणार, याची त्याने मनाशी खात्री बाळगली होती. मात्र, झाले ते उलटेच. पाटील हा पोलीस लाईनमध्ये भाऊबिजेसाठी आला होता. त्याने घरातून बाहेर पडतानाच गवस याला संपर्क केला. तेव्हा त्याच्याकडे भाऊबिजेच्या भेटीची पिशवी पण होती. तो आपल्या फ्लॅटवर जाण्यासाठी गाडीत बसणार होता.

Web Title: 'Lachchuchpat' made of dandruff made by

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.