वीस हेक्टरवर अळीचा हल्ला
By Admin | Updated: July 4, 2014 00:12 IST2014-07-04T00:04:53+5:302014-07-04T00:12:40+5:30
पावसाने मारले : भातशेती धोक्यात, रोपे पिवळी पडली, शेतकऱ्यापुढे संकट उभे

वीस हेक्टरवर अळीचा हल्ला
रत्नागिरी : जिल्ह्याचे प्रमुख पीक भात असून, पावसाअभावी भातशेती धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुक्यांतील २० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणची रोपे पिवळी पडून वाळू लागली आहेत, तर काही ठिकाणी भातरोपांवर करपा रोग पडला आहे.
लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे रोपवाटिका एका रात्रीत नष्ट होते. राजापूर तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांच्या चार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. लांजा तालुक्यातील १५९ शेतकऱ्यांच्या ७.०९ हेक्टर क्षेत्रावर तसेच संगमेश्वर तालुक्यातील ८० शेतकऱ्यांच्या ९ हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. राजापूर तालुक्यातील बाधित क्षेत्रावर कीटकनाशकांची फवारणी करून २.७५ हेक्टर क्षेत्र तसेच लांजा तालुक्यातील प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात आला आहे
जिल्ह्यातील ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. मात्र, त्यासाठी ७ हजार ३ हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी करण्यात आली आहे, तर १३०८ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाअभावी भातशेती पिवळी पडू लागली आहे. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी धरणाच्या, विहिरीच्या पाण्याने भातशेती लावण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, कडकडीत उन्हामुळे भिजवलेले क्षेत्र वाळत आहे. हळव्या, गरव्या, निमगरव्या भातबियाण्यांचा शेतकऱ्यांनी वापर केला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३०० मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने शेतीची अवस्था बिकट आहे. जुलै सुरू झाला असून, दुबार पेरणी करणे आता शक्य होणार नाही. कृषी विभागाकडे हळव्या जातीचे २९१ क्विंटल, निमगरवे ७५ क्विंटल, तर गरवे १५ क्विंटल भात बियाणे शिल्लक आहे. हळव्या जातीचे भात दुबार पेरणीसाठी वापरले जाऊ शकते. मात्र, निमगरवे, गरवे भात वापरणे आता शक्य नाही. या सर्व प्रकारामुळे भातशेती धोक्यात आली आहे. (प्रतिनिधी)