आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे कोविड सेंटर रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:15+5:302021-04-24T04:32:15+5:30
खेड : येथे कोरोना वेगाने पसरत असल्याने आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने नवीन कोविड सेंटरसाठी इमारत उपलब्ध झाली, आवश्यक ...

आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे कोविड सेंटर रखडले
खेड : येथे कोरोना वेगाने पसरत असल्याने आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने नवीन कोविड सेंटरसाठी इमारत उपलब्ध झाली, आवश्यक प्राथमिक साहित्यही मिळाले; मात्र दहा दिवसात खेड आरोग्य विभागाने कोणतीही हालचाल न केल्याने रुग्ण आणि नातेवाइकांची परवड सुरूच आहे.
कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील शिवतेज आरोग्य संस्थेच्या इमारतीत नवीन कोविड केअर सेंटर चालू करण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी सुमारे दहा दिवसांपूर्वी इमारत उपलब्ध करून दिली होती आणि तत्काळ औषधे, औषधे ठेवण्यासाठी रॅक्स, कपाटे, स्टेशनरी सॅनिटायझर आदी गोष्टींची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते; मात्र येथील ढिम्म प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांत कोणतीही हालचाल न केल्यामुळे रुग्ण व नातेवाइकांच्या अडचणी संपलेल्या नाहीत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात केवळ २०० बेडची क्षमता आहे तर जवळपास साडेतीनशे रुग्ण सक्रिय आहेत. कमी बेड संख्येमुळे रुग्णांना होम आयसोलेशन करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गांभीर्य नसलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून दहा दिवसांत कोणत्याही सुविधा उपलब्ध केल्या नसल्याचे शुक्रवारच्या आढावा बैठकीत निष्पन्न झाले.
आमदार योगेश कदम यांनी शंभर बेडची क्षमता असलेले कोविड केअर सेंटर शहरात मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्याचे प्रयत्न पंधरा दिवसांपूर्वी सुरू केले होते. या कोविड सेंटरसाठी आवश्यक असलेली इमारत, शंभर खाटा व इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करून दिले आहेत; मात्र प्राथमिक साहित्य येऊनही आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे दहा दिवस उलटूनही हे सर्वसामान्य जनतेला कोविड केअर सेंटर सुरू होऊ शकले नाही. आढावा बैठकीत आमदार कदम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधून शुक्रवारी संध्याकाळी औषधे व इतर साहित्य पोहोचवण्याचे आदेश दिले. या कोविड सेंटरची सुरुवात शनिवार, २४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.