कोपरी नारायण देवस्थानतर्फे कुमारिका पूजन

By Admin | Updated: July 16, 2015 23:02 IST2015-07-16T23:02:44+5:302015-07-16T23:02:44+5:30

पुरुषोत्तम मास : गुहागरातील सर्व मंदिरांच्या प्रतिनिधींचा सहभाग

Kopri Narayan Devasthan through the Kanya Poojan | कोपरी नारायण देवस्थानतर्फे कुमारिका पूजन

कोपरी नारायण देवस्थानतर्फे कुमारिका पूजन

गुहागर : पुरूषोत्तम मासानिमित्त सर्व ज्ञातीतील कुमारिकांच्या पूजनाचा एक अनोखा कार्यक्रम श्री देव कोपरी नारायण देवस्थान, वरचापाट (ता. गुहागर) येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुमारिकांचे पूजन करण्याकरिता शहरातील सर्व मंदिरांच्या प्रतिनिधीना बोलावण्यात आले होते.
गुहागर शहरातील वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानच्या वतीने पुरूषोत्तम मासानिमित्त कुमारिका पूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व ज्ञातींच्या कुमारिकांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले होते.
त्याचप्रमाणे कुमारिकांचे पूजन करण्यासाठी नेहमीची चौकट मोडून शहरातील सर्व देवस्थानांच्या प्रतिनिधींना खास आमंत्रित करण्यात आले होते. सामूहिक पध्दतीने वेदमंत्रांच्या घोषात ४२ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व कुमारिकांना पेन, पट्टी, रुमाल, खोडरबर, शार्पनर, शिसपेन्सील, रंगीत पेन असे शैक्षणिक साहित्य एका आकर्षक पाऊचमधून देण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात, उत्कृष्ट नियोजनातून साकारला. ज्ञातींचा लवलेश संपून आपण सर्वजण एक आहोत, ही भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांच्या हृदयाला भिडली.
कुमारिका पूजनाच्या कार्यक्रमानंतर एका छोटेखानी सभेत या कार्यक्रमाचा हेतू मयुरेश पाटणकर यांनी सर्वांना सांगितला. वेद, पुराण, महाभारत, रामायण, इतिहास, वर्तन अशा सर्वकालीन साहित्यातून स्त्रीचे महत्त्व आम्हाला मान्य होते, असे दिसते. परंतु प्रत्यक्षात बलात्काराची बातमी नाही, असे वर्तमानपत्र सापडत नाही. अशावेळी स्त्रीचे समाजातील स्थान सर्वांनाच समजावे म्हणून कुमारिका, तिचे पालक आणि समाज या तिघांवरही संस्कार व्हावा म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये कुमारिका पूजन सांगितले आहे.
या कार्यक्रमासाठी श्री कोपरी नारायण देवस्थानचे अद्वैत गोखले, अमित जोशी, महेश दीक्षित, समीर घाणेकर, उमेश ओक, मनीष खरे, अद्वैत जोशी आणि मयुरेश पाटणकर यांनी मेहनत घेतली होती. कुमारिका पुजनासाठी उपनगराध्यक्ष स्नेहा वरंडे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, गुप्तहेर विभागाचे टेकर, पत्रकार विनोद घाडे, लक्ष्मीनारायण देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत दीक्षित, व्याडेशर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, उफराटा गणपती देवस्थानचे अध्यक्ष डॉ. वसंत ओक, दत्त देवस्थानचे अध्यक्ष शशिधर शेटे, जांभळादेवी देवस्थानचे श्रीधर बागकर, अष्टवणे गणपती देवस्थानचे शशिकांत गोणबरे, वराती देवस्थानचे मोरे, नगरसेविका बागकर, गीता खरे, भाजपच्या शहर महिला आघाडी प्रमुख श्रध्दा घाडे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Kopri Narayan Devasthan through the Kanya Poojan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.