कोकण रेल्वे : आश्वासने हवेत विरली...
By Admin | Updated: October 7, 2014 23:49 IST2014-10-07T22:25:03+5:302014-10-07T23:49:51+5:30
प्रकल्पग्रस्त अद्याप वाऱ्यावरच, अनेक प्रश्न अजून जैसे थे!

कोकण रेल्वे : आश्वासने हवेत विरली...
एजाज पटेल - फुणगूस -कोकण रेल्वे आली आणि स्वप्न साकार झाले, हे वाक्य केवळ फलकावर लिहिण्यासाठीच शोभादायक असून, आजही अनेक प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेत नोकरी मिळवण्यापासून वंचितच आहेत. कष्टकरी, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून रेल्वे धावत असली तरी याचा प्रत्यक्ष लाभ कोकणपेक्षा अन्य राज्यानाच अधिक होत आहे. कोकणवासीयांना संघर्ष केल्याशिवाय कोकण रेल्वेने काहीच दिले नाही. कोकण रेल्वेकडून होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवण्यासाठी तातडीची उपाययोजना हाती घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या न थांबणे, स्थानिक कष्टकरी प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मिळणे, रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स संगनमत करुन परप्रांतीयांना देणे, आवश्यक असताना जादा गाड्या न सोडणे, रेल्वे स्थानकावरील गैरसोयी दूर न करणे, यासह अनेक कारणांमुळे कोकणवासीयांना कोकण रेल्वे प्रशासनाचा खरा चेहरा दिसून आला. मात्र, संघटित होऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी योग्य दिशा न मिळाल्यामुळे कोकणवासीयांच्या मनातील उद्रेक उग्ररुप धारण करु शकला, असे मत व्यक्त होताना दिसत आहे.
कोकण रेल्वे मार्ग ज्या गावांमधून गेला आहे, त्या सर्वच गावांमधून ग्राम स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनेचा बोजवारा उडाला आहे. रेल्वेतून बाहेर रुळावर पडणारा मैला आणि सर्व प्रकारचा कचरा ही मोठी समस्या बनली आहे. यामुळे कोकणात सर्वाधिक प्रदूषण हे त्यामुळे होत असल्याचे एका पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये दोन स्वच्छतागृह असतात. प्रत्येक डब्यातून किमान १५० प्रवासी सफर करतात. प्रवाशांना स्वच्छतागृहाचा वापर हा अनिवार्यच आहे. मात्र, रेल्वेत प्रवाशांसाठी असणारे स्वच्छतागृह रेल्वेमार्ग ज्या गावातून गेला आहे, त्यांच्यासाठी अस्वच्छता पसरवत आहे. स्वच्छतागृहातील मलमुत्रांच्या विसर्जनासाठी वेगळी सोय नसल्याने हा मैला रेल्वे रुळांवर सर्वाधिक प्रदूषण करत आहे.
चहा देण्यासाठी असणारी कुल्हडची योजना बारगळल्यानंतर आता सर्रास प्लास्टिकचे कप वापरले जात आहेत. हे प्लास्टिक कप रेल्वे रुळावर सर्वाधिक प्रदूषण करणारे ठरत आहेत. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर जेवणाच्या प्लेट्स तसेच प्लास्टिकचे कप सर्व गाड्यांतून जातात.
कोकणातील गाव निर्मल ग्राम होण्यामध्ये रुळावरुन फिरणाऱ्या रेल्वेचा अडसर हे असल्याने प्रदूषण मंडळ, पर्यावरण विभाग आदींनी कोकण रेल्वेला प्रदूषण रोखण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी कोकणातील बहुतांश ग्रामपंचायतींनी केली आहे. कोकण रेल्वेविरुद्धच्या प्रदूषण रोखण्याच्या लढ्यात केवळ कोकण रेल्वे मार्ग ज्या ग्रामपंचायत हद्दीतून गेला आहे, त्या ग्रामपंचायतींचाच समावेश नसून, सर्वच ग्रामपंचायती या लढ्याला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे केले तरच या लढ्याला यश येईल.