कोकण रेल्वेचे रूपडे बदलले; समस्या तशाच, प्रवास कंटाळवाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:44 PM2019-06-22T12:44:59+5:302019-06-22T12:49:32+5:30

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले आहे. बाह्यरंगांवरून चकाचक दिसणाऱ्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत.

Konkan Railway forms changed; The problem is similar, the travel tireless | कोकण रेल्वेचे रूपडे बदलले; समस्या तशाच, प्रवास कंटाळवाणा

कोकण रेल्वेचे रूपडे बदलले; समस्या तशाच, प्रवास कंटाळवाणा

Next
ठळक मुद्देकोकण रेल्वेचे रूपडे बदलले; समस्या तशाच, प्रवास कंटाळवाणा या गाडीचा इतर राज्यातील प्रवाशांनाच अधिक फायदा

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले आहे. बाह्यरंगांवरून चकाचक दिसणाऱ्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत.

आरक्षणाच्या डब्यात अजूनही जनरल तिकीटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण आणखीनच वाढले असून, गाडीतील वीज आणि पंखे बंद असण्याची समस्या डोकेदुखी ठरत आहे. गाडीतील शौचालयातही विजेच्या समस्येबरोबरच पाण्याचीही समस्या भेडसावत आहे. बहुतांशी सगळ्याच समस्यांनी भरून वाहणाऱ्या या गाड्या म्हणजे केवळ रूपडे बदलले पण समस्या तशाच, असे म्हणण्याची वेळ आली आहे.


कोकणासाठी भूषणावह असणाऱ्या कोकण रेल्वेचा प्रवास कोकणातील माणसांसाठी दिवसेंदिवस अधिकच महाग होत चालला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या या गाड्यांचा कोकणी जनतेला फायदा कमीच होत आहे. या मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस या गाडीला कायमच वर्दळ असते. कोकणची कन्या म्हणून ओळख असणाऱ्या या गाडीचा इतर राज्यातील प्रवाशांनाच अधिक फायदा होत आहे.


कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या सुरूवातीपासून प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या दोन्ही गाड्यांचे रूपडे आता बदलण्यात आले आहे.

आधी या गाड्यांना आयसीएफ कोच होते. आता नव्या स्वरुपात या दोन्ही गाड्यांना अधिक लांबीचे व अधिक प्रवासी क्षमता असलेले एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. या एलएचबी कोचमध्ये एलईडी दिवे, हायड्रॉलिक शॉक अ‍ॅबसॉर्बर्स, डिस्क बे्रक प्रणाली, उत्तम सस्पेंशन या सुविधा देण्यात आल्या आहेत.

या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले असले तरी या गाड्यांमधील समस्या तशाच आहेत. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या गाड्यांपेक्षा जुनं तेच सोनं असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गाडीतून प्रवास करताना जनरल डब्याचे तिकीट घेणारे प्रवासी थेट आरक्षित डब्यांतूनच प्रवास करतात. या प्रवाशांमुळे जादा पैसे मोजून सुखाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नीटसा प्रवासही करता येत नाही. या डब्यातील तिकीट तपासनीसदेखील काही करू शकत नाहीत, हे विशेष.

गाडीतील पंख्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, बहुतांशी पंखे बंदावस्थेतच असतात. जे सुरू असतात, त्या पंख्यांची हवाच प्रवाशांना लागत नाही. शौचालयातील दिवे तर पूर्णत: बंदावस्थेत असतात तसेच शौचालयात पाणीच नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे ही गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की, कोकण रेल्वेच्या देखाव्यासाठी आहे, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. गाडीतील या समस्यांमुळे जुन्याच गाड्या बऱ्या होत्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गाडीतील प्रवाशांमधून या समस्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

गाडीचे डबे वाढविण्याऐवजी केले कमी

गाडीची प्रवासी क्षमता वाढवताना या गाड्यांच्या बोगींची संख्या पूर्वीच्या २४ वरून आता २२ करण्यात आली आहे. जनरल डब्यांची संख्या कमी केल्याने हे प्रवासी थेट आरक्षित डब्यात शिरतात. त्यामुळे वादाचे प्रसंगही उद्भवतात. गाडीला चांगले भारमान असूनही डब्यांची संख्या का वाढवली जात नाही, असा सवाल केला जात आहे.

रेल्वे प्रशासन गंभीरच नाही

गतिमान प्रशासनाचे स्वप्न पाहणाऱ्या शासनाने प्रवाशांनी केलेल्या ट्विटनंतर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. यापूर्वी कोकण रेल्वेकडून तशी दखलही घेतली जात होती. मात्र, आता प्रवाशांनी मांडलेल्या समस्येची दखलच घेतली जात नसल्याचे दिसत आहे. प्रवाशांबाबत रेल्वे प्रशासन गंभीरच नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाईल पॉइंट बंदावस्थेत

गाडीत अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. आरक्षित डब्यात मोबाईल चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. पण, त्यासाठी ठेवण्यात आलेले स्वीच बंदावस्थेतच आहेत. त्यामुळे चार्जिंग करायचे कसे? याबाबत तिकीट तपासनीसांना विचारले असता, गाडी नवीनच आहे, असे कसे होऊ शकते असे आश्चर्यकारक उत्तर देतात.

Web Title: Konkan Railway forms changed; The problem is similar, the travel tireless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.