वडापाव विक्रेत्यास सुरीने भोसकले
By Admin | Updated: October 10, 2015 23:49 IST2015-10-10T23:48:53+5:302015-10-10T23:49:56+5:30
रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील घटना : बाचाबाचीतून हाणामारी

वडापाव विक्रेत्यास सुरीने भोसकले
रत्नागिरी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत होऊन वडापाव व्यावसायिकाच्या अंगावर सुरीने जोरदार वार करण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. १०) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हरिश्चंद्र गोविंद पवार (वय ४०, रा. कारवांची वाडी, रत्नागिरी) हे रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात वडापावचा व्यवसाय करतात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते रेल्वेस्थानक परिसरात इतर रिक्षाचालकांसोबत थट्टामस्करी करीत होते. यावेळी संशयित आरोपी रिक्षाचालक नितीन पवार तेथे आला. हरिश्चंद्र पवार हे त्याला काहीतरी बोलले, या गैरसमजातून नितीन याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या रागातून त्याने हरिश्चंद्र यांच्या वडापावच्या गाडीवरील सुरी आणून डाव्या बरगडीवर वार केला.
हरिश्चंद्र यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी रात्रीच संशयित आरोपीस अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश धेंडे करीत आहेत. (वार्ताहर)