अणुस्कुरा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:47+5:302021-09-10T04:38:47+5:30

राजापूर : गेले काही दिवस अणुस्कुरा घाटमार्गे कोकणातील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढल्याने संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे ...

Kingdom of pits on the atomic path | अणुस्कुरा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

अणुस्कुरा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

राजापूर : गेले काही दिवस अणुस्कुरा घाटमार्गे कोकणातील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढल्याने संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक बनले आहे. गणेशोत्सवाच्या काळात होणारी वाहनांची गर्दी पाहता यामार्गे अवजड वाहनांना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी वाढू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत कोकण - कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात पडझड होऊन तो घाट वाहतुकीला बंद करण्यात आला होता. शिवाय कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे अन्य घाटही धोकादायक बनल्याने अणुस्कुरा या एकमेव घाटमार्गे वाहतुक सुरू असल्याने गेल्या काही दिवसांत अणुस्कुरा घाटमार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये रत्नागिरीसह गुहागर, देवरुख, लांजा, राजापूर आगाराची एसटी वाहतूक या मार्गे सुरू आहे. कोकणात येणारी सर्व प्रकारची मालवाहतूक, पेट्रोल, डिझेल, गॅस वाहतूक करणारी वाहने जळाऊ लाकडांची वाहतूक व सर्व प्रकारची खासगी वाहतूकही याच मार्गाने होत आहे. त्यामुळे मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. मात्र, काही ठिकाणचे खड्डे तसेच असल्याने चाकरमान्यांसह स्थानिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. ओणी-अणुस्कुरामार्गे कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहतूक गणेशोत्सव काळात काही दिवस बंद ठेवावी, अशी मागणी आता लोक करत आहेत. किमान सणासुदीच्या दिवसात तरी हे बुजवले जाणार आहेत का नाही, असाही संतप्त प्रश्नही लोक करत आहेत. या मार्गावरील रायपाटण - पाचलला जोडणाऱ्या निवळ वहाळावरील पूल व रायपाटण येथील मोरी यांच्या भक्कमपणाबद्दल आता शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात या पुलासह मोरीचीही दुरुस्ती करावी लागणार आहे.

Web Title: Kingdom of pits on the atomic path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.