...हा तर ग्रामीण भागामध्ये भांडण लावण्याचा प्रकार : शौकत मुकादम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:36+5:302021-08-29T04:30:36+5:30
चिपळूण : ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, अशाच लोकांना ग्रामसभांना बसता येईल, असे आदेश सरकारने दिले आहेत. हा एक ...

...हा तर ग्रामीण भागामध्ये भांडण लावण्याचा प्रकार : शौकत मुकादम
चिपळूण : ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, अशाच लोकांना ग्रामसभांना बसता येईल, असे आदेश सरकारने दिले आहेत. हा एक प्रकारे ग्रामीण भागातील गावामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार असल्याचे मत पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी व्यक्त केले.
काही गावांची लोकसंख्या ४ हजार, ५ हजार आहे. तिथे भीक घातल्यासारखे ५० ते १०० डोस दिले जातात. लोकसंख्येच्या मानाने शासनाकडून डोसच दिले जात नाही. मग लोक डोस घेणार कसे, एखाद्या व्यक्तीने एक डोस घेतला असेल आणि दुसरा डोस शासनाकडून उपलब्ध झाला नसेल, तर त्यात लोकांचा काय दोष? ग्रामीण भागामध्ये काही सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसभेला उपस्थित राहणारे कार्य अधिकारी यांनी डोस घेतलेले नाहीत. आधी गावातील लोकांना डोस मिळू दे, वयोवृद्धांना घेऊ दे, मग आम्ही घेऊ, असे त्यांनी मोठ्या मनाने सांगितल्यामुळे गावातील ६० टक्के लोक डोस घेण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे दोन डोसची अट घालून शासनाने ग्रामीण भागामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला आहे, असे ते म्हणाले.
परमिट रूम, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी प्रवेशाला दोन डोसची अट आहे का, मग ग्रामीण भागामध्ये ही अट कशासाठी, एखाद्या व्यक्तीचे टेंपरेचर व पल्स टेस्ट करून ग्रामसभेला बसण्यास परवानगी देण्यास हरकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. सर्वात प्रथम गावामध्ये राहणाऱ्या लोकांचे लसीकरण पूर्ण करा व मग ग्रामसभा घ्या. नको ते कायदे काढून ग्रामीण भागामध्ये भांडण लावण्याचे थांबवा, असेही मुकादम यांनी सांगितले.