ठिकठिकाणी चोर सोडून संन्याशाला मार!
By Admin | Updated: September 30, 2015 00:02 IST2015-09-29T21:35:05+5:302015-09-30T00:02:29+5:30
लांजा तालुक्यातील प्रकाराचा अज्ञातांना फटका, अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना

ठिकठिकाणी चोर सोडून संन्याशाला मार!
लांजा : तालुक्यातील कुवे, लांजा बाजारपेठ आणि वैभव वसाहत या ठिकाणी अज्ञात व्यक्ती लोकांच्या दृष्टीपथात पडत आहेत. यामुळे तरूण मंडळी सर्वत्र जागता पहारा ठेवत आहेत. मात्र, या दहशतीची चोर सोडून संन्याशालाच जास्त झळ पोहोचत आहे. अनोळखी व्यक्ती दिसताच चोर समजून त्याला मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे.कुवे नवीन वसाहत, मराठवाडी, गुरववाडी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून अज्ञातांकडून विविध पक्ष्यांचे आवाज काढणे, महिलांच्या किंचाळण्याचा आवाज येणे, घराच्या कड्या वाजवणे, घरांवर दगड मारणे, असे नानाविध प्रकार घडत असल्याने येथील तरुणवर्ग रात्रभर जागता पहारा देत आहे. रविवारी रात्री वैभव वसाहतीत घराच्या मागील भागात महिलेला पाहताच एका अज्ञाताने उडी मारून पोबारा केला. त्यानंतर १०० तरुणांनी हातामध्ये लाठ्या, काठ्या घेऊन सर्वत्र शोध घेत परिसर पालथा घातला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. सोमवारी रात्री छोटूभाई देसाई हॉस्पिटलनजीकच्या तरुणांना रस्त्याच्या बाजूला मोरीचा आसरा घेतलेली एक व्यक्ती नजरेस पडली. त्यानंतरही सुमारे १५० तरुणांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन परिसर पालथा घालत असताना एका भाताच्या मळीमध्ये भात तुडविल्याचे तरुणांच्या लक्षात आले. या तरुणांबरोबर लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एच. आर. डंगारे हेसुध्दा आपल्या पथकासह अज्ञाताचा शोध घेत होते. मात्र, अज्ञात व्यक्ती पळ काढण्यात माहीर असल्याने माणसांचा कानोसा लागताच क्षणार्धात पळ काढतात. गेले दोन दिवस कुवे गावामध्ये होणारे प्रकार थांबले आहेत. मात्र, लांजामध्ये हे प्रकार वाढीस लागले आहेत.गेले पंधरा दिवस कुवे येथे घडत असलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यातील जनता अॅलर्ट झाली असून, गावामध्ये सायंकाळच्या वेळी अज्ञात व्यक्ती दिसताच त्याची विचारपूस केली जाते, चोर समजून त्याला प्रसादही दिला जातो. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास महाड येथील ६५ वर्षीय वृद्ध आपला रस्ता चुकले होते. ते वेरवली पिकअप शेडमध्ये थांबले होते. त्यांना येथील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महाड येथील शांताराम सुखदेव उमासरे हे २७ सप्टेंबर रोजी मुंबईत जाण्याऐवजी चुकून सोमवारी दुपारी लांजा येथे आले. वेरवली मार्गावरुन जाणाऱ्या गाडीमध्ये बसले आणि वेरवली येथे उतरले. त्यांना काहीच समजत नसल्याने ते सायंकाळपर्यंत याच ठिकाणी थांबून राहिले. मात्र, अनोळखी असल्याने दुपारपासून सायंकाळपर्यंत एकाच ठिकाणी हे वृद्ध थांबल्याने ग्रामस्थांना शंका आली. येथील ग्रामस्थांनी त्यांची विचारपूस केली. मात्र, काहीच समजत नसल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांचे पुतणे तुकाराम काशिराम उमासरे यांनी लांजा येथे पोलीस स्थानकात येऊन आपले चुलते शांताराम उमासरे यांना ताब्यात घेतले आहे. रविवारी सायंकाळी कुवे येथे अज्ञात दिलीप पुनीराम चव्हाण (२३, रायपूर) याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच डी. पी. अब्दुल्ला (६०, केरळ) यांनाही लांजातील काही नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. तो कामाच्या शोधार्थ भटकत होता. (प्रतिनिधी)
लांजा तालुक्यात पाहुणे जाताय? सांभाळून!
सध्या लांजा तालुक्यात अज्ञातानी घातलेल्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्येक गावामध्ये जागता पहारा ठेवण्यात येत आहे. त्यामुळे गावात कोणी अनोळखी व्यक्ती दिसताच त्याला चोर समजून चोप दिला जातो. चोर सोडून संन्यासाला शिक्षा मिळत असल्याने पाहुणे जाताना दिवसाचेच जावे लागते.