खोपी - रामजीवाडीत डोंगर कोसळण्याची शक्यता

By Admin | Updated: August 6, 2014 00:41 IST2014-08-06T00:08:26+5:302014-08-06T00:41:52+5:30

प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी : तात्पुरती राहण्याची सोय, स्थलांतराचा विचार

Khopi - The possibility of collapsing in Ramjiwadi | खोपी - रामजीवाडीत डोंगर कोसळण्याची शक्यता

खोपी - रामजीवाडीत डोंगर कोसळण्याची शक्यता

खेड : तालुक्यातील खोपी - रामजीवाडी येथील धनगर समाजाच्या वस्तीनजीकच्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. यामुळे हा डोंगर कासळण्याची भीती व्यक्त होत असून, प्रांताधिकारी जयकृष्ण फड यांनी मंगळवारी सकाळी या भागाची पाहणी केली. येथील ९ कुटुंबांची व्यवस्था खोपी येथील गावठाण शाळेत आणि हायस्कूलमध्ये करण्यात आली असून, या कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सन २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये या डोंगराला या भेगा पडल्या आहेत़ मुसळधार पावसात हा डोंगर कधीही कोसळू शकतो. दरम्यान, खेडचे प्रांताधिकारी जयकृष्ण फड यांनी मंगळवारी सकाळी रामजीवाडीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर तेथील धनगर समाजातील ९ कुटुंबांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था खोपी येथील गावठाण शाळेत आणि हायस्कूलमध्ये केली आहे़ या कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सरपंच प्रणिता भोसले यांनी ही माहिती दिली आहे़
२००५मधील अतिवृष्टीत डोंगराला मोठी भेग पडली होती. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी संतोषकुमार यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून या घरांचे स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होेते. शिवाय येथील तहसीलदारांनी घरांसाठी जागा उपलध करून देण्याविषयी कळविले होते. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी जागाही उपलब्ध केली असूून, त्यासाठी लागणारी कागदपत्रही तहसीलदारांना सादर केली आहेत. मात्र, आजपर्यंत आपल्या घरांचे पुनर्वसन किंवा स्थलांतर करण्याबाबत प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नाहीत, या घरांचे संरक्षण करण्याकामी प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. याबाबतचे निवेदन संबंधित ग्रामस्थांनी येथील तहसीलदारांना १ आॅगस्ट रोजी दिले आहे. या डोंगरामध्ये १०० मीटर लांबीची व दोन फूट रूंदीची मोठी भेग पडली आहे. मोठमोठे दगड या दरडीतून खाली येण्याची भीती आहे. ४ जुलै रोजी या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी येथे भेट दिली होती़ यावेळी त्यांनीही ग्रामस्थांना सतर्कतेची सूचना दिली आहे. आता येथील मातीदेखील खाली सरकू लागली आहे. माळीणसारखी घटना घडण्याची शासन प्रतीक्षा करीत नाही ना? अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Khopi - The possibility of collapsing in Ramjiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.