मानसिक संतुलन बिघडल्याने खेडेकर यांचे बेछूट आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST2021-09-23T04:35:22+5:302021-09-23T04:35:22+5:30
खेड : नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पितळ शिवसेनेच्या नगरसेवकांनी उघड केल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले असून, ते ...

मानसिक संतुलन बिघडल्याने खेडेकर यांचे बेछूट आरोप
खेड : नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पितळ शिवसेनेच्या नगरसेवकांनी उघड केल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले असून, ते नगरसेवकांबाबत वायफळ बडबड करत आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्यांनी वैयक्तिकरित्या शासनाकडे पाठपुरावा करून शहर विकासासाठी कोणता व किती निधी आणला, हे जाहीर करावे, असे खुले आव्हान शिवसेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरी यांनी दिले आहे.
नगराध्यक्ष खेडेकर यांनी सेना नगरसेवकांवर केलेल्या आरोपाचे खंडन तोडकरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर आरोप करण्याइतकी पात्रता त्यांच्यात नाही. रामदास कदम यांच्यावर टीका करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा खटाटोप त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र, शहरातील जनता सुज्ञ असून, केलेला भ्रष्टाचार अंगलट आल्यानेच खेडेकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. रामदास कदम यांनी कोणाला मोठे केले, असा प्रश्न नगराध्यक्षांनी स्वतःला विचारावा, असा टोलाही ताेडकरी यांनी या पत्रकातून लगावला आहे.
खेडेकर यांनी पदाचा गैरवापर करून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत सेना नगरसेवकांनी पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार नगरविकास खात्याकडून चौकशीअंती कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालात कोणता शेरा मारला, हेदेखील जनतेला समजले आहे. सेना नगरसेवकांवर आरोप करून स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न खेडेकर करत असल्याचा आरोप या प्रसिद्धीपत्रकात तोडकरी यांनी केला आहे.