खेड तालुका -सायबर तपास सैरभैर
By Admin | Updated: August 24, 2014 22:34 IST2014-08-24T22:11:04+5:302014-08-24T22:34:05+5:30
तपास यंत्रणा नसल्याने उकलच होईना

खेड तालुका -सायबर तपास सैरभैर
श्रीकांत चाळके- खेड --खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत सायबर गुन्ह्यात वाढ झालेली आढळून आली आहे. येथील पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी एकाही गुन्ह्याचा शोध अद्याप लागलेला नाही. खेडसारख्या ठिकाणी सायबर गुन्ह्यासाठी तपास यंत्रणाच नसल्याने या गुन्ह्यात वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अलिकडेच मोठमोठ्या शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरून परस्पर पैसे काढण्याच्या घटना वाढीला लागल्या आहेत. खेडमध्ये हे प्रमाण चिंताजनक आहे. मुंबई आणि पुण्यात होत असलेले हे गुन्हे खेडसारख्या ठिकाणी होत असल्याने सर्वसामान्य माणसामध्ये भीती निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यातही गेल्या काही महिन्यांमध्ये सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मोबाईलवर इंटरनेटची सुविधा तसेच त्याबाबत झालेल्या जागरूकतेमुळे आता फसवणुकीचे प्रमाणही वाढले असून या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आता निर्माण झाली आहे. सायबर क्राईममध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते.
खेड पोलीस स्थानकात असे ७ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, यातील एकाचाही छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. अनोळखी खातेदाराचा मोबाईल मिळवून त्याला भ्रमणध्वनीद्वारे बँकेच्या अधिकाऱ्याचे नाव सांगत खातेदाराचा एटीएम क्रमांक मिळवला जातो. त्याद्वारे हजारो रूपये परस्पर काढले जातात. याचप्रकारे अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारांच्या तक्रारी दाखल होत असल्या तरीही त्याची उकल होत नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे सायबर क्राईमला मोकळे वातावरण मिळाले आहे.
खेडमध्ये जून आणि जुलै महिन्यात अशा प्रकारच्या घटना सलग घडल्याने तालुक्यासह जिल्ह्यातदेखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे ग्राहकांकडून वेळोवेळी पालन होत नाही.
तसेच पोलिसांकडूनही सावधगिरीचे उपाय सुचवण्यात येतात. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़ वर्षभरात खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील २ आणि शहरातील ५ सायबर गुन्हे पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. मात्र, सायबर गुन्ह्याकामी आवश्यक असलेली तपास यंत्रणा मुंबईमध्येच असल्याने येथील या गुन्ह्यांचा छडा लावणे अशक्य झाले आहे. मुंबई येथील सायबर यंत्रणेकडे अख्ख्या राज्यातून केसीस दाखल होत असल्याने आणि जिल्ह्यातही अशी कोणतीही यंत्रणा नसल्याने सायबर क्राईमचा तपास रखडत आहे. तपासयंत्रणा अशीच कामे करीत राहीली तर या गुन्ह्यामध्ये वाढ होत राहणार, असेच सकृतदर्शनी दिसून येत आहे़