खेडमध्ये मोकाट जनावरांचा दुकानांसमोर ठिय्या; नगर परिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:12+5:302021-09-18T04:34:12+5:30

खेड : खेड-भरणे मार्गावर मोकाट जनावरांच्या वावराने वाहनचालकांसह पादचारी हैराण झालेले असतानाच शहरातील बाजारपेठेमध्येही त्यांनी बस्तान मांडले आहे. यामुळे ...

In Khed, Mokat animals sit in front of shops; Neglected by the city council | खेडमध्ये मोकाट जनावरांचा दुकानांसमोर ठिय्या; नगर परिषदेचे दुर्लक्ष

खेडमध्ये मोकाट जनावरांचा दुकानांसमोर ठिय्या; नगर परिषदेचे दुर्लक्ष

खेड : खेड-भरणे मार्गावर मोकाट जनावरांच्या वावराने वाहनचालकांसह पादचारी हैराण झालेले असतानाच शहरातील बाजारपेठेमध्येही त्यांनी बस्तान मांडले आहे. यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे. तरीही मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाईसाठी नगर परिषद प्रशासनास सवड मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खेड-भरणे मार्गावर मोकाट जनावरे भर रस्त्यातच ठाण मांडत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाईसाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने याचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना होत आहे. तरीही संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाईसाठी प्रशासन पुढाकार घेत नसल्याने जनावरांच्या मालकांचे फावत चालले आहे. मोकाट जनावरे मार्गात आडवी येत असल्याने अपघातही घडत आहेत. आता मोकाट जनावरांनी आपला मोर्चा बाजारपेठेकडे वळवला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने मोकाट जनावरांचा त्रास होत आहे. मोकाट जनावरे दुकानांसमोरच बस्तान ठोकत असल्याने सर्वत्र पसरणारी दुर्गंधी त्रासदायक ठरत आहे. नगर परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र, याचा नगर परिषद प्रशासनाला विसर पडला आहे.

------------------

मालकावर कारवाई हवी

मोकाट जनावरे दुकानासमोरच ठिय्या मांडून परिसर अस्वच्छ करत असल्याने दुकान व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली आहे. नागरिक व पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने गाढवे व जनावरांच्या मालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

-हर्षदीप सासने, व्यावसायिक, खेड

Web Title: In Khed, Mokat animals sit in front of shops; Neglected by the city council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.