खंडाळा-जाकादेवी- मासेगाव मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST2021-09-18T04:33:52+5:302021-09-18T04:33:52+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा-जाकादेवी-मासेगाव (निवळी) या मुख्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे गणेशोत्सव कालावधीतही भरले गेले ...

खंडाळा-जाकादेवी- मासेगाव मार्ग खड्ड्यात
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा-जाकादेवी-मासेगाव (निवळी) या मुख्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे गणेशोत्सव कालावधीतही भरले गेले नाहीत. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या महामार्गावरून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सभापती, विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांची ये- जा सुरू असूनही तेही शांत कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिंदल कंपनीकडून या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागते आहे. दुचाकी, लहान कार, रिक्षा यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे गाड्यांचेही नुकसान होऊ लागले आहे. आजारी व्यक्तींना या रस्त्यामुळे डॉक्टरांकडे नेणे-आणणेही फार जिकिरीचे होते. निवळी ते जाकादेवी हा दिवस-रात्र प्रवासाचा महत्त्वाचा महामार्ग आहे. जिंदलची अवजड वाहतूकही या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात सुरू असते. असे असताना हा वाहतुकीच्या मार्गाकडे प्रशासन किंवा संबंधित ठेकेदार का दुर्लक्ष करतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खंडाळा-जाकादेवी-मासेगाव-निवळी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्त्याची चांगल्या प्रकारे डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या माजी सभापती व जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमान सदस्य ऋतुजा जाधव प्रयत्नशील आहेत. अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच आरटीओ ऑफिस कार्यालय मात्र, त्यांची मागणीसंबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्णत्वास गेली नाही. निवळी जाकादेवी खंडाळा रस्त्याच्या खड्ड्यांमुळे जर अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यास या अपघाताला मेरिटाइन बोर्ड, जिंदल, सार्वजनिक बांधकाम विभाग, चौगुले कंपनी यांना जबाबदार धरले जाईल, असे ऋतुजा राजेश जाधव यांनी सांगितले.