केळशीने जपली आहे शेकडो वर्षांची पलिते नाचाची प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:07+5:302021-09-15T04:37:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दापोली : कोकणात शिमगोत्सव व गणेशोत्सव हे दोन सण अतिशय महत्त्वाचे. या दोन्ही सणांत कोकणामध्ये मोठ्या ...

केळशीने जपली आहे शेकडो वर्षांची पलिते नाचाची प्रथा
लोकमत न्यूज नेटवर्क
दापोली : कोकणात शिमगोत्सव व गणेशोत्सव हे दोन सण अतिशय महत्त्वाचे. या दोन्ही सणांत कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पारंपरिक कला सादर करण्याची शेकडो वर्षांची परंपरा कायम आहे. दापोली तालुक्यातील केळशी गावानेही शेकडो वर्षांची पलिते नाच ही परंपरा जपली आहे.
कोकणात अनेक गावांची ओळख त्यांच्या पारंपरिक कलेतून केली जाते. वेगवेगळ्या गावची वेगवेगळी कला म्हणून ओळखली जाते. अशाच प्रकारची एक पारंपरिक कला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी गाव जपत आहे. गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या आदल्या रात्री गावातील सगळी मंडळी देवळात एकत्र येतात. गौरीसमोर हातात पेटत्या मशाल घेऊन ढोल-ताशांच्या गजरात गोल रिंगण धरत नाचतात. या पारंपरिक नाचाला गौरीचा ‘पलिते नाच’ असे म्हटले जाते.
दोनशे वर्षांपेक्षा अधिक काळ ही प्रथा गावात सुरू असल्याचे जुनेजाणते लोक सांगतात. वाढत्या शहरीकरणामुळे, नोकरीधंद्यासाठी गावातील तरुण शहरांकडे जात असल्याने अनेक गावांमधील अशा कला लोप पावल्या आहेत. परंतु केळशी गावाने मात्र ही कला आजही जपली आहे. अलीकडे तरुण मुलांचाही या पलिते नाचामध्ये मोठा सहभाग असतो. गणेशोत्सव व शिमगोत्सव या दोन्ही उत्सवांमध्ये ही कला सादर केले जाते.
गणेशोत्सवादरम्यान गौरी पाठविण्याच्या दिवशी रात्री हा नाच गौरी- गणपतीसमोर सादर केला जातो. प्रत्येक वाडीतील मंडळींचा यामध्ये सहभाग असतो. हा नाच पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. दापोली तालुक्यामध्ये फक्त केळशी गावातच हा नाच केला जातो. अनेक लोक मोठ्या भक्तिभावे या नाचात सहभाग घेतात. रात्रभर केल्या जाणाऱ्या या नृत्यातून गौरीचा जागर घालण्याची प्रथा सुरू आहे.