कान्होजी आंग्रे सागरी मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ
By Admin | Updated: January 14, 2015 00:40 IST2015-01-14T00:01:44+5:302015-01-14T00:40:22+5:30
तुषार वाळुंजकर : महाराष्ट्र एनसीसी व महाराष्ट्र नेव्हल युनिटतर्फे आयोजन

कान्होजी आंग्रे सागरी मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ
रत्नागिरी : महाराष्ट्र राष्ट्रीय एन. सी. सी. मुख्यालय, मुंबई व दोन महाराष्ट्रा नेव्हल युनिट, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सरखेल कान्होजी आंग्रे कोकणरत्न सागरी मोहिमेला दि. १८ जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती नागपूरचे एन. सी. सी. कमांडिंग आॅफीसर कॅ. तुषार वाळुंजकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी कमांडिंग आॅफीसर कर्नल पी. वाय. परबते उपस्थित होते.महाराष्ट्र नेव्हल युनिट एन. सी. सी., रत्नागिरीतर्फे सहावी सागरी नौका भ्रमण मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेत दोन शिडाच्या २७ फुटी बोटीतून दहा दिवसात दहा बंदरांना भेट देण्यात येणार आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ मुलगे व ११ मुली तसेच भूदल व वायू दलातील मिळून एकूण ४४ छात्रसैनिक, दोन अध्यापकीय एनसीसी आॅफीसर, ६ नौसैनिक, १ नौका प्रतिमान निदर्शक, प्रशिक्षित लिपिक, लेखालिपिक, वाहनचालक, लष्कर आदी सहभागी होणार आहेत. दोन शिडांच्या नौकांसह दोन मोठ्या मच्छिमारी नौका व एक यांत्रिक बोट यात सहभागी होणार आहे.
छात्रसैनिकांच्या धाडसी व पाण्यातील साहसी वृत्तीला चालना देणे, तसेच त्यांच्यामध्ये विश्वास, शक्ती, मानसिक वृत्ती बळकट करणे व दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कॅ. वाळुंजकर यांनी दिली. मुक्कामाच्या गावात पथनाट्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणयात येणार आहे. स्त्रीमुक्ती सुधारणा, प्रथमोपचार, पर्यावरण समतोल, समुद्री पर्यावरण समतोल, स्वच्छता अभियान याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच भारताच्या तिन्ही दलात किंवा तटरक्षक दलांमध्ये ग्रामीण युवकांना समाविष्ट होण्यास लागणाऱ्या शैक्षणिक व शारीरिक प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे.
दोन शिडांच्या बोटीतील केवळ कॅन्व्हासच्या शिडाच्या माध्यमातून ५२० किलोमीटर सागरी प्रवास करण्यात येणार आहे. दि. १८ रोजी मोहिमेला देवगड पोर्ट बंदर येथून प्रारंभ होणार असून, विजयदुर्ग येथे मुक्काम आहे. १९ रोजी विजयदुर्ग ते रत्नागिरी, दि. २० रोजी रत्नागिरी ते जयगड, दि. २१ रोजी जयगड ते हर्णै, दि. २२ रोजी हर्णै ते मुरूड (आगरदांडा), दि. २३ रोजी मुरूड (आगरदांडा) ते अलिबाग दि. २४ रोजी मुक्काम असून, दि. २५ रोजी परतीच्या प्रवासाला प्रारंभ होणार आहे. दि. २५ रोजी अलिबाग ते रेवदंडा, दि. २६ रोजी रेवदंडा ते श्रीवर्धन, दि. २७ रोजी श्रीवर्धन ते दाभोळ, दि. २८ रोजी दाभोळ ते रत्नागिरी असा प्रवास होणार आहे. (प्रतिनिधी)
मोहिमेत दोन शिडाच्या बोटीतून दहा दिवसात दहा बंदरांना भेट देण्यात येणार.
\रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ मुलगे व ११ मुली तसेच भूदल व वायू दलातील मिळून एकूण ४४ छात्रसैनिक, दोन अध्यापकीय एनसीसी आॅफीसर, ६ नौसैनिक, १ नौका प्रतिमान निदर्शक सहभागी होणार.