गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कांदळवन सोसायटी
By Admin | Updated: February 2, 2015 23:50 IST2015-02-02T22:33:21+5:302015-02-02T23:50:46+5:30
अरविंद उंटावले : खारफुटीवरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कांदळवन सोसायटी
रत्नागिरी : मॅन्ग्रोव्ह सोसायटी आॅफ इंडियाचा रिसर्च सोसायटीचा कोकण विभाग व गोगटे - जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक पाणथळ दिना’चे औचित्य साधून ‘कोकण खारफुटी’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मॅनग्रोव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंंद उंटावले यांच्या हस्ते गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले. मुंबई विद्यापीठ गीताने चर्चासत्राची सुरुवात झाली. प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. एस. कुलकर्णी यांनी बायोलॉजिकल सायन्स विभागाचे पॉवरपॉर्इंट प्रेझेंटेशन केले. या विभागांतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन खारफुटीच्या संरक्षणासाठी विभागाचे कार्य कसे चालते, याची माहिती दिली. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी पाणथळ जमिनीचा कोणताच उपयोग नाही म्हणून कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांना त्यावर अतिक्रमणे सुरु झाल्याचे सांगून पर्यावरणामध्ये या जमिनीविषयी जनजागृती करण्याकरिता आणि तेथे उगवणाऱ्या ‘खारफुटी’ या वनस्पतींच्या संरक्षणासाठी परिषद असल्याचे स्पष्ट केले. प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अॅड. विलास पाटणे यांच्या हस्ते मॅनग्रोव्ह सोसायटी आॅफ इंडियातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे विमोचन केले. परिषदेकरिता आलेल्या संशोधनपर निबंधाच्या आराखड्याच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अरविंंद उंटावले यांच्या हस्ते करण्यात आले. खारफुटी ही जैवविविधतेने भरलेली इको सिस्टीम आहे. मानवाला ‘जैव’ आणि ‘अर्थ’दृष्ट्या ती महत्त्वाची आहे. सागरीसंपदेचा त्यात भरणा असतो. सागरी मत्स्योत्पादनाचा स्रोत येथे असतो. पूर, चक्रीवादळ, त्सुनामीपासून संरक्षण करणाऱ्या या खारफुटीचा ऱ्हास होण्यास मानव कारणीभूत आहे, असे डॉ. उंटावले यांनी सांगितले.मॅन्ग्रोव्ह सोसायटी आता प्रत्येक सागरीकिनाऱ्यावर जागृता करुन खारफुटीचे रोपण करत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर डॉ. विनोद धारगाळकर, डॉ. शेखर कोवळे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रा. राजीव सप्रे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)