स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेला कल्पवृक्ष हातिस येथे उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST2021-08-15T04:32:16+5:302021-08-15T04:32:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्याची आठवण म्हणून रत्नागिरी तालुक्यातील हातिस गावामध्ये एक कल्पवृक्ष ...

स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेला कल्पवृक्ष हातिस येथे उभा
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्याची आठवण म्हणून रत्नागिरी तालुक्यातील हातिस गावामध्ये एक कल्पवृक्ष अर्थात नारळाचे झाड लावण्यात आले होते. गेले ७४ वर्षे वादळ, वारे सहन करत हे झाड आजही दिमाखात उभे असून, बदलत्या काळाचा साक्षीदार ठरला आहे. याच कल्पवृक्षाच्या प्रेरणेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गावामध्ये नारळाची ७५ झाडे स्वातंत्र्यदिनी लावण्यात येणार आहेत.
देश स्वतंत्र झाल्याची माहिती दळणवळणाची काेणतीही साधने नसलेल्या रत्नागिरी तालुक्यातील हातिस गावापर्यंतही पोहाेचली होती. आता काही हयात नसलेले आणि आता वयोवृद्ध झालेले त्या काळातील तरुण देश स्वतंत्र झाल्याचे ऐकताच एकत्र आले. सर्वांच्या अंगात उत्साह भरला होता. त्या काळात विजेची सुविधा नव्हती, त्यामुळे ग्रामस्थांनी बॅटऱ्या बांबूला बांधल्या. त्याच्या उजेडात ढोल-ताशांच्या गजरात स्वातंत्र्याची मिरवणूक काढली.
देशात स्वातंत्र्यदिन मिठाई वाटून अगर सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. परंतु, हातिसमधील तरुणांच्या मनात काहीतरी वेगळे करण्याची धडपड होती. त्या काळी हातिसच्या किनाऱ्यावर नारळ सुपारीच्या बागा होत्या. येथील शेतकरी नारळ, सुपारीची राेपे आपल्या बागेतच तयार करत असत. स्वातंत्र्याची आठवण म्हणून या कल्पवृक्षाची अर्थात नारळाच्या रोपाची लागवड करण्याची कल्पना तरुणांना सुचली आणि तातडीने ती अमलात आणली.
त्यासाठी नारळाचे उत्तम रोप शोधण्यात आले. गावातील भैरी-जुगाई मंदिराच्या आवारातील जागा निश्चित करण्यात आली आणि ढोल-ताशांच्या गजरात त्या रोपाची मिरवणूक काढण्यात आली. निवडलेल्या जागी स्वातंत्र्यदिनाची आठवण म्हणून या कल्पवृक्षाची लागवड करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे हे प्रतीक आजही दिमाखात उभे आहे.
यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्ताने हातिस ग्रामविकास मंडळातर्फे नारळाची ७५ नारळ झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, केंद्रीय नारळ बोर्डाचे माजी सदस्य राजाभाऊ लिमये, रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती कुमार शेट्ये, डॉ. दिलीप नागवेकर, मरिनर दिलीप भाटकर, सरपंच कांचन नागवेकर तसेच हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. तुषार नागवेकर, उपाध्यक्ष दिवाकर नागवेकर, विजय नागवेकर, जयवंत नागवेकर, राजेंद्र नागवेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------
हा कल्पवृक्ष आता हातीस गावाचा अभिमान ठरले असून, गेली अनेक वर्षे हातिस ग्रामस्थ आणि शाळेतील मुले स्वातंत्र्यदिनी त्याचा पारंपरिक आरती ओवाळून आणि आधुनिक पद्धतीने केक कापून वाढदिवस साजरा करतात. अनेक वेळा हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला आहे. सन २०२० स्वातंत्र्यदिनी भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशाेधन केंद्राचे माजी कृषी विद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर यांच्याकडून मिळालेली ४० नारळ रोपे लावून साजरा केला होता.