कालसेकर फरारच
By Admin | Updated: July 16, 2015 23:51 IST2015-07-16T23:51:57+5:302015-07-16T23:51:57+5:30
चर्चांना उधाण : अजूनही पलायनाचा गुन्हा दाखल नाही

कालसेकर फरारच
रत्नागिरी : जिल्ह्याभरात सर्वत्र नाकाबंदी असूनही रुग्णालयातून पळालेला सराईत गुंड साहील कालसेकर दीड दिवसानंतरही पोलीस यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या कालसेकरविरुद्ध गुरुवारी रात्रीपर्यंत पलायनचा गुन्हाच दाखल झालेला नाही.बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास साहील कालसेकर याने जिल्हा शासकीय रुग्णालयातून पलायन केले. त्याच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी चार पोलीस तैनात केले होते. मात्र, त्यांच्या हातावर तुरी देऊन साहील रूग्णालयातून सटकला. त्या चार पोलिसांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.साहील पळून गेल्यानंतर लगेचच सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. केवळ रत्नागिरीच नाही, तर जिल्ह्यातील सर्व पोलिसांना याबाबतचे आदेश देण्यात आले. साहीलच्या सर्व ठावठिकाणांवर पोलिसांनी नजर ठेवली. नाकाबंदीबरोबरच शहरातील सर्व छुप्या अड्ड्यांवर पोलिसांनी धाडी टाकल्या. एमआयडीसीतील स्टरलाईटचा परिसर पिंजून काढला. मात्र, कालसेकरचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही. तो रत्नागिरी शहरामध्येच आहे की, शहराबाहेर आहे? त्याला शहरातच कोणी मदत करतो आहे का? अशा एक ना अनेक गोष्टींनी याबाबत गूढ वाढत आहे. कालसेकरची माहिती देणाऱ्या इसमाला पोलीस यंत्रणेकडून बक्षीस देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा गुरुवारी शहरातील नाक्यानाक्यांवर सुरू होती. दरम्यान, संगमेश्वर तालुक्यामध्ये एका दुचाकीची चोरी झाली. ही दुचाकी कालसेकर याने चोरली असेल आणि तो जिल्ह्याबाहेर गेला असेल, अशा अनेक चर्चा लोकच रंगवित होते. सद्य:स्थितीत जिल्ह्याबाहेर एकही पथक पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे कालसेकर जिल्ह्यातच लपलेला आहे, असे गृहित धरून पोलीस तपास सुरू आहे. (वार्ताहर)