कादिवली शाळा दुसऱ्या दिवशीही बंदच

By Admin | Updated: April 1, 2015 00:13 IST2015-03-31T21:30:42+5:302015-04-01T00:13:26+5:30

ग्रामस्थ ठाम : गटशिक्षणाधिकारी-ग्रामस्थांची बैठक फोल

The Kadivli school is closed on the next day | कादिवली शाळा दुसऱ्या दिवशीही बंदच

कादिवली शाळा दुसऱ्या दिवशीही बंदच

दापोली : कादिवली शाळेत २७ मार्च रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर गेले दोन दिवस कादिवली जिल्हा परिषद मराठी शाळा बंद असून, शिक्षण विस्तार अधिकारी एन. के. शिंदे व उपशिक्षक सुशील पावरा यांची तालुक्याबाहेर बदली होत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याने गटशिक्षणाधिकारी खोत व ग्रामस्थ यांच्यातील कादिवली येथे झालेली बैठक फोल ठरली आहे.
कादिवली शाळेत २७ मार्च रोजी सकाळी ९ च्या सुमारास माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली. विद्येच्या मंदिरातच शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यात जोरदार भांडण झाले. हे भांडण एवढ्यावरच थांबले नाही तर चक्क वर्गातील विद्यार्थ्यांसमोर चाकूने वारसुद्धा झाले. त्यामुळे वर्गात रक्ताचा सडा पडला. हा दुर्दैवी प्रकार पाहून विद्यार्थी मात्र चांगलेच घाबरले. काही विद्यार्थी वर्गात रडायलासुद्धा लागले. घाबरलेल्या मनस्थितीत विद्यार्थ्यांनी घर गाठले व शाळेत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे पालक चांगलेच संतापले. शिक्षकच वर्गात मुलांसमोर भांडणे व चाकूहल्ला करत असताना मुलांनी शिक्षकांचा काय आदर्श घ्यावा, असे म्हणत जोपर्यंत शिक्षक शाळेत आहेत तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठवायचे नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
वर्गातील दुर्दैवी प्रकार बघितल्यामुळे विद्यार्थीसुद्धा घाबरुन शाळेत जायला धजावत नाहीत. गेले दोन दिवस एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकला नाही. या शाळेतील मुख्याध्यापक खांबल व इतर दुसरे शिक्षक गेली दोन दिवस शाळेच्या वेळेत हजर आहेत. परंतु विद्यार्थ्यांविना शाळा उघडून करणार काय म्हणून शाळेचे कुलूप बंदच आहे.
विस्तार अधिकारी वार्षिक तपासणीच्या निमित्ताने कादिवली शाळेत दाखल झाले. सोबत इतर अधिकारीसुद्धा होते. मात्र, असे असतानासुद्धा पावरा ज्या वर्गात शिकवत आहेत, त्याच वर्गात जाऊन तुम्ही काय शिकवता, असे विद्याथ्यर्सांसामोर ओरडायला लागले. शिक्षक व विस्तार अधिकारी यांच्यात वर्गात चांगली खडाजंगी झाली. त्यातून चाकूही काढण्यात आला. चाकू कोणी शाळेत आणला, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. असे असले तरी चाकूचे वार मात्र शिक्षक पावरा यांच्या बोटावर आहेत.
दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सुशील पावरा या शिक्षकाची कागदपत्र गहाळ करण्यात आली आहेत. ती कागदपत्र आपल्याला मिळावीत म्हणून पावरा यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. मात्र, तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी वेळेत माहिती दिली नाही म्हणून पावरा यांनी कोकण आयुक्तांकडे अपील केले होते. कोकण आयुक्तानी एक महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे पत्र मुख्य कार्यक़ारी अधिकारी, रत्नागिरी यांना दिले आहे. त्याचा राग मनात धरुन २७ मार्च रोजी सकाळी ८ च्या सुमारास शाळेत दाखल झाले. (प्रतिनिधी)


कादिवली शाळा खूप चांगली आहे. या शाळेत मुलांना चांगले शिकवले जाते. परंतु शाळेतच आपले वैयक्तिक वाद व कार्यालयीन भांडणे मुलांसमोर वर्गातच काढून या गावच्या शाळेला बदनाम करण्याचा घाट विस्तार अधिकारी एन. के. शिंदे व पावरा यांनी घातला आहे. त्यामुळे असे कर्मचारी, अधिकारी पुन्हा येथे आल्यास मुलांच्या मनावर दडपण येऊ शकते म्हणून त्यांची तालुकाबाह्य बदली व्हावी.
- संतोष जगदाळे
माजी अध्यक्ष, शालेय समिती

Web Title: The Kadivli school is closed on the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.