जिजामाता उद्यानासाठी साडेसहा लाख
By Admin | Updated: January 10, 2015 00:12 IST2015-01-09T21:49:14+5:302015-01-10T00:12:15+5:30
हे उद्यान वृद्ध व मुलांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करावी,

जिजामाता उद्यानासाठी साडेसहा लाख
चिपळूण : खेड येथील जिजामाता उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून, या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, खेडतर्फे देण्यात आला होता. याची दखल घेऊन या उद्यानासाठी साडेसहा लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा पूनम पाटणे यांनी दिली. जिजामाता उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून, उद्यानामध्ये लहान मुलांची खेळण्याची सोय आहे. परंतु, या ठिकाणी गवत वाढले असून, खेळणीही नादुरुस्त झाली आहेत. या परिसरात अस्वच्छता आहे. या उद्यानाच्या पाठीमागे तलावही आहे. लोखंडी ग्रील्स पूर्णपणे तुटलेले आहे. एखादे लहान मुल खेळताना दुर्घटना घडू शकते. उद्यानाच्या सभोवती बांधण्यात आलेली भिंतही नादुरुस्त आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा व गेटच्या सभोवती असणारे काँक्रीट उखडले आहे. याबाबत रिपब्लिकन पार्टी खेड तालुका अध्यक्ष शंकर तांबे, युवा अध्यक्ष रजनिकांत जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने उद्यानाच्या दुरुस्तीबाबत नगराध्यक्षा पूनम पाटणे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. १९ पर्यंत काम न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही देण्यात आला होता. पंधरा दिवसांच्या मुदतीनंतर पुन्हा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष पाटणे यांची भेट घेऊन उद्यानाबाबत काय झाले, याची विचारपूस केली. नगराध्यक्ष पाटणे यांनी या उद्यानासाठी साडेसहा लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे सांगितले. या अंदाजपत्रकाला मंजूरी असून, लवकरच उद्यानाचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन पाटणे यांनी दिले असल्याने १९ जानेवारी रोजी होणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. (वार्ताहर)
जिजामाता उद्यानाची तात्पुरती डागडुजी करुन हे उद्यान वृद्ध व मुलांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणीही रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, खेडतर्फे करण्यात आली आहे.