‘जिद्द’च्या विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर

By Admin | Updated: October 21, 2016 01:02 IST2016-10-21T01:02:27+5:302016-10-21T01:02:27+5:30

तीन वर्षे निरंतर शिक्षण : भारतातील पहिले विशेष विद्यार्थी

'Jidd' students made Kalsubai summit head | ‘जिद्द’च्या विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर

‘जिद्द’च्या विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर

चिपळूण : विशेष विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन गेली २० वर्षे तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ‘जिद्द’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर करुन महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील पहिले विशेष विद्यार्थी बनण्याचा सन्मान मिळवला आहे.
गेल्या वर्षीही ‘जिद्द’ शाळेने ‘पर्यावरण मित्र विप्रो अर्थियन २०१५ पुरस्कार’ मिळवून हा पुरस्कार मिळविणारी भारतातील पहिली शाळा बनण्याचा सन्मान मिळवला होता. या पुरस्काराचा एक भाग म्हणून विप्रोतर्फे शाळेत तीन वर्षे निरंतर शिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार होता. या निरंतर प्रशिक्षणांतर्गत पहिल्या टप्प्यात दि. १४ ते १६ या कालावधीत बायोकल्चरल कॅम्प घेण्यात आला होता. या कॅम्पचा भंडारदरा-सांदण व्हॅली व कळसूबाई ट्रेक तसेच या भागात राहणाऱ्या ठाकर व महादेव कोळी या आदिवासी लोकांची संस्कृती, राहणीमान याचा अभ्यास करणे, जैवविविधतेचा अभ्यास करणे, गरजांचा अभ्यास करणे हा उद्देश होता. यामध्ये जिद्द शाळेबरोबरच गोवा, पुणे व नगरमधील पुरस्कारप्राप्त शाळांचा समावेश होता. जिद्द शाळेतून अक्षय लिंगायत, तुषार बोराटे, अमोल मोरे व शिक्षक उमेश कुचेकर यांची या कॅम्पसाठी निवड झाली होती. यामध्ये जिद्दच्या विद्यार्थ्यांनी अन्य सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबर आदिवासी लोकांची संस्कृती, राहणीमान, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल अशी सांदण दरी, भंडारदरा धरण यांचा अभ्यास यात हिरीरीने भाग घेतला. तसेच समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर हे कोणाच्याही मदतीशिवाय किंंबहुना नॉर्मल विद्यार्थ्यांना मदत करत सर करुन सर्वांचीच मने जिंकली.
आदिवासी लोकांबरोबर ठाकर नृत्य करुन स्थानिक पिकांची माहिती घेत या विद्यार्थ्यांनी आपण खरंच विशेष आहोत हे दाखवून दिले. या बायोकल्चरल कॅम्पमधील पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणेच्या प्रोग्रॅम आॅफिसर अ‍ॅनी ग्रेगरी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
गेल्यावर्षी जिद्द शाळेला मिळाला होता ‘पर्यावरण मित्र विप्रो अर्थियन २०१५’ पुरस्कार.
पुरस्कार मिळवणारी भारतातील ‘जिद्द’ ही पहिली शाळा.
विप्रोतर्फे जिद्द शाळेत तीन वर्षे निरंतर शिक्षण कार्यक्रम.
निरंतर प्रशिक्षणांतर्गत पहिल्या टप्प्यात बायोकल्चरल कॅम्प.
आदिवासी लोकांबरोबर सादर केले ठाकर नृत्य.
कळसूबाई शिखर विद्यार्थ्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय केले सर.

Web Title: 'Jidd' students made Kalsubai summit head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.