जवखेड हत्याकांड : हजारो कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग
By Admin | Updated: November 11, 2014 23:18 IST2014-11-11T22:31:57+5:302014-11-11T23:18:29+5:30
चिपळूण : रिपब्लिकन व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी

जवखेड हत्याकांड : हजारो कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग
चिपळूण : मानवता की क्या पहेचान, मानव मानव एकसमान, ना गर्व ना अभिमान, मानव सारे एकसमान... जातीवादाने क्या किया, देश का सत्यानाश किया... जातीवाद की क्या पहेचान, नंगा भूखा हिंदुस्तान... जवखेड मानवी हत्याकांडाचा निषेध असो... मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे... मारेकऱ्यांची सीआयडी चौकशी करा... अशा गगनभेदी घोषणा देत रिपब्लिकन व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जवखेड हत्याकांडाच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) मोर्चा काढला.
२० आॅक्टोबर रोजी जवखेड येथे संजय जाधव यांच्या कुटुंबीयांची निर्घृण हत्या झाली. फुले - शाहू - आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला हा प्रकार मानवतेला मान खाली घालायला लावणारा असाच होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा निषेध मोर्चा काढला. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथून या मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी चौक, एस. टी. स्टॅण्डमार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करुन मारेकऱ्यांना फाशी द्या, या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, असे मागणी करणारे निवेदन देण्यात आले. आपण आपले निवेदन शासन स्तरावर पाठवू, असे उपविभागीय अधिकारी हजारे यांनी सांगितले.
या मोर्चात शीलभद्र जाधव, महेंद्र कदम, युवराज मोहिते, राजूभाई जाधव, रमण मोहिते, सचिन मोहिते, सीताराम जाधव, रमाकांत सकपाळ, उदय कदम, संजय गमरे, दत्ताराम मोहिते, प्रदीप उदेग, संजय जाबरे, अशोक कदम, काँग्रेसचे अशोक जाधव, सुधीर दाभोळकर, लक्ष्मण खेतले, सुमती जांभेकर, जागरुक नागरिक मंचचे तानू आंबेकर, राजेश जाधव यांच्यासह हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामध्ये महिला व तरुणींची संख्या लक्षणीय होती.
निळे झेंडे, विविध संघटनांचे फलक, घोषणापत्र मोर्चात जागोजागी झळकत होते. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, आनंद कोकरे, त्यांचे नऊ अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी व सीआरएफची एक तुकडी मोर्चाबरोबर होती.
प्रांत कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवला. मोर्चेकऱ्यांचे एक शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी दालनात गेले व त्यांनी निवेदन सादर केले. बाहेर मोर्चाचे एका छोटेखानी सभेत रुपांतर झाले.(प्रतिनिधी)
जवखेड येथील हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांतर्फे चिपळूण येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी महेंद्र कदम, राजू जाधव, शीलभद्र जाधव, युवराज मोहिते, रमण मोहिते, राजेश जाधव असे विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये मोठ्या संख्येने महिला व युवती सहभागी झाल्या होत्या.
रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, चिपळूण तालुका बौद्धजन पंचायत समिती, तालुका बौद्ध हितसंरक्षक समिती, कुणबी सेना, बहुजन समाज पाटी, आरपीआय, महारेजिमेंट, बहुजन मुक्ती पार्टी, भारिप बहुजन, आदिवासी आदीम कातकरी संघटना, बामसेफ, एस. टी. कर्मचारी, परिवर्तन निर्धार संस्था, अंधश्रद्धा निर्मुलन संघटना, एस. टी.कामगार संघटना, बौद्धसमाज आठगाव संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, भारत मुक्ती मोर्चा, जागरुक नागरिक मंच, काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
.
निळे झेंडे घेऊन मागासवर्गीयांच्या विविध संघटना रस्त्यावर.
काँग्रेस व विविध संघटनांचे मिळाले पाठबळ.
गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून ९ पोलीस अधिकारी, ६० कर्मचारी व सीआरएफची एक तुकडी तैनात.