जाखडी नृत्याचा वसा जपण्याचा ध्यास
By Admin | Updated: November 15, 2015 23:55 IST2015-11-15T21:38:02+5:302015-11-15T23:55:33+5:30
लांजा तालुका : नृत्य स्पर्धेत मल्लिकार्जून गणेशकृपा नाच मंडळाचे यश

जाखडी नृत्याचा वसा जपण्याचा ध्यास
अनिल कासारे-- लांजा --व्यवसायाने फोटोग्राफर... मात्र पारंपरिक जाखडी कलेचा वारसा लाभलेल्या गवाणे येथील रवींद्र उर्फ पिंट्या आकाराम कोटकर या युवकाला जाखडी नृत्याची कला स्वस्थ बसू देत नव्हती. गवाणे रेवाळेवाडी येथील आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्यांनी मल्लिकार्जून गणेशकृपा नाच मंडळाची निर्मिती केली. नुकत्याच घेण्यात आलेल्या जाखडी नृत्य स्पर्धेत प्रथमच पदार्पण करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
रवींद्र कोटकर हा लहानपणापासून आपल्या मामांच्या गावाला असल्याने त्याचे शिक्षण देखील गवाणे येथेच झाले आहे. त्याचे आजोबा सद्गुरु शाहीर गोविंद राघो तटकरे व मामा शाहीर गजानन मारुती तटकरे यांच्या नाच मंडळामध्ये वयाच्या ५व्या वर्षापासून नृत्य कलाकार म्हणून सहभागी झाला. त्यानंतर मामा व आजोबा यांच्या गाण्यांना तो कोरस देत त्याने आपल्या आवाजाचा करिश्मा दाखवायला सुरुवात केली. यात त्याला गणेश गोपाळे, प्रशांत कोटकर यांनी भक्कम साथ दिली आहे.
नुकतेच कुवे येथे कलगी - तुरा उन्नती समाज मंडळ, लांजा संलग्न राजापूर - रत्नागिरी यांच्यावतीने जाखडी नृत्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये त्यांनी यश मिळविले. शाहीर गजानन तटकरे, शाहीर तुषार पंदेरे यांनी त्याला मार्गदर्शन केले.
बाबूरंगले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे शिष्य गोविंद, विश्राम यांचे शिष्य सखाराम, मारुती यांचे भिकाजी, तुकाराम यांचे शिष्य बाळू, रामचंद्र यांचे शिष्य गजानन, विश्वनाथ यांचे शिष्य शाहीर रवींद्र आकाराम कोटकर यांच्यासह गणेश कृष्णा गोपाळे, प्रशांत कोटकर, प्रशांत शिंदे, प्रकाश तटकरे, यशवंत रेवाळे, मोहिते व नृत्य कलाकार मुले यांचा मोलाचा वाटा आहे.