जननी सुरक्षा योजनेचा ५९७ महिलांना लाभ
By Admin | Updated: July 25, 2014 22:51 IST2014-07-25T22:28:12+5:302014-07-25T22:51:10+5:30
या योजनेअंतर्गत ६ लाख ७१ हजार ६०० रुपयांचे अनुदान वाटप

जननी सुरक्षा योजनेचा ५९७ महिलांना लाभ
राजेश कांबळे - अडरे
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील ५९७ मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत ६ लाख ७१ हजार ६०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.
ग्रामीण व शहरी भागातील मातांची प्रसुती शासकीय रुग्णालयात किंवा मानांकित केलेल्या खासगी रुग्णालयामध्ये झाल्यास अशा मातांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. सदरचा लाभ हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना दिला जातो.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात अथवा मानांकित केलेल्या खासगी रुग्णालयामध्ये प्रसुती झालेल्या मातांना ७०० रुपये, तर शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थींना २२०० रुपये धनादेशाद्वारे लाभ दिला जातो. त्याचप्रमाणे शहरी भागात अथवा मानांकित केलेल्या खासगी रुग्णालयात प्रसुती झाल्यास लाभार्थीला ६०० रुपये, तर शस्त्रक्रिया झालेल्यांना २१०० रुपये धनादेशाद्वारे लाभ दिला जातो.
आॅगस्ट २०१३ पासून या योजनेचे पेमेंट आॅनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. आॅनलाईन पद्धतीने ७०० रुपयांच्या २३२ लाभार्थींना, तर २२०० रुपयांच्या ५४ लाभार्थीना लाभ देण्यात आला. २०१३-१४ मध्ये या आर्थिक वर्षामध्ये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत धनादेशाद्वारे २५२ लाभार्थींना ७०० रुपयांप्रमाणे, तर ५९ लाभार्थींना २२०० रुपये देण्यात आले आहेत.
जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत अनेक विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण भागात आशामार्फत तर शहरी भागात स्वयंसेविकांमार्फत जनजागृती कार्यक्रम राबविला जातो. गरोदर महिलांची नोंदणी या दरम्यान करण्यात येते.
२०१४-१५ मध्ये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मातांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चिपळूण तालुका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.