जैतापूर प्रकल्प मंजुरीचे स्वागत : केळुसकर

By Admin | Updated: April 16, 2015 00:03 IST2015-04-15T23:33:34+5:302015-04-16T00:03:25+5:30

विरोध प्रकल्पाला नव्हे विकासाला

Jaitapur welcome project approval: Keluskar | जैतापूर प्रकल्प मंजुरीचे स्वागत : केळुसकर

जैतापूर प्रकल्प मंजुरीचे स्वागत : केळुसकर

कणकवली : भारताच्या जलद विकासाची घोडदौड रोखण्यासाठी अमेरिकेने भारतामध्ये होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांना खो घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यात अरेवा आणि एल अ‍ॅण्ड टी या कंपनीशी करार करून जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामाला चालना दिली आहे. आम्ही या मंजुरीचे स्वागत करतो. भाजपासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे विकासाला विरोध आहे, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी व्यक्त केली.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मंजुरीच्या अनुषंगाने कोकण विकास आघाडीच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक आघाडीच्या मुंबई- दादर येथील मुख्य कार्यालयात सोमवारी झाली. यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, खजिनदार सुरेश केळुसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब परब, मुख्य संघटक प्रकाश तावडे, रमाकांत जाधव, भाई चव्हाण, भिकाजी जाधव, चंद्रकांत आंबे्र, राजेंद्र केळुसकर आदी उपस्थित होते.
केळुसकर यांनी, रायपाटण येथे झालेल्या कोकण विकास आघाडीच्या ३२व्या अधिवेशनामध्ये ठराव मांडून आम्ही जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जैतापूर परिसरातील स्थानिक नेत्यांनी आम्हाला विरोध केला होता. कोणत्याही राष्ट्राचा विजेच्या मुबलक पुरवठ्याअभावी विकास होऊ शकत नाही. अणुऊर्जा हा विजेचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध करताना शिवसेनेच्या नेत्यांनी या अणुऊर्जेबाबत आपले अज्ञान प्रकट करताना स्थानिक लोकांच्या मनात अनाठायी भीती निर्माण केली होती. त्यामुळे आंदोलन होऊन एका कार्यकर्त्याला स्वत:चा जीव नाहक गमवावा लागला होता, असे म्हणाले.
ते म्हणाले, आपल्या देशात १९५२ पासून मुंबईनजीकच्या तुर्भे अणुऊर्जा प्रकल्पासह अलिकडील कारवार येथील प्रकल्प सुरक्षितपणे सुरू आहे. अद्ययावत उच्च बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे कितीही मोठी नैसर्गिक संकटे आली तरी या प्रकल्पाची साधी वीटही हलणार नाही. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आम्ही ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला. शेतकऱ्यांच्या या प्रकल्पाचा त्यामुळे विरोध मावळला. मात्र, मताच्या राजकारणासाठी शिवसेनेची नेतेमंडळी नाहक मुद्दा घेऊनच वाटचाल करीत आहे. या प्रकल्पामध्ये एक लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)


जैतापूर प्रकल्पाबाबत मुंबईत कोकण विकास आघाडीची तातडीची बैठक.
मताच्या राजकारणासाठी सेनेचा विरोध : केळुस्कर.

Web Title: Jaitapur welcome project approval: Keluskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.