जैतापूरप्रश्नी ‘भाजपा’ची संदिग्ध भूमिका शिवसेनेला ठरणार मारक ?
By Admin | Updated: May 31, 2014 01:08 IST2014-05-31T01:07:10+5:302014-05-31T01:08:37+5:30
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता

जैतापूरप्रश्नी ‘भाजपा’ची संदिग्ध भूमिका शिवसेनेला ठरणार मारक ?
रत्नागिरी : स्थानिकांचा जैतापूर प्रकल्पाला विरोध असल्याने शिवसेनेनेही या अणुऊर्जा प्रकल्पाला आपला विरोध असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत भाजपची आतापर्यंतची भूमिका ही ‘तळ्यात मळ्यात’ आहे. केंद्रातील मोदी सरकारकडे प्रकल्पविरोधी भूमिका पटविण्यात शिवसेनेला यश न आल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे १० हजार मेगावॅटच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पात जमिनी गेलेल्यांनी प्रथम मोबदला स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर चांगले पॅकेज दिल्यानंतर अनेक जमीनमालकांनी पैसे स्वीकारले. त्यामुळे या प्रकल्पाला असलेला स्थानिकांचा विरोध मावळला, असे चित्र निर्माण झाले आहे. स्थानिकांचा विरोध असल्याचे नेते व कार्यकर्ते सांगत आहेत. मच्छिमारही विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हा मुद्दा हाती घेत प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी लोक मोठ्या संख्येने शिवसेनेबरोबर असल्याचे चित्र आहे. प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या प्रकल्पाचे भवितव्य आता मोदी सरकारच्या हाती आहे. त्यामुळे या राष्टÑीय प्रकल्पाबाबत मोदी सरकारने विरोधाची भूमिका घेतल्यास त्याचे जागतिक संबंधांवर परिणाम होण्याची भीती आहे. विरोधाची भूमिका न घेतल्यास प्रकल्पग्रस्तांचा रोष ओढवून घ्यावा लागणार आहे. परिणामी ‘...सोडले तर पळते’ अशी भाजपाची स्थिती होणार आहे. विजयी मिरवणुकीच्यानिमित्ताने रत्नागिरीत आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना जैतापूर प्रकल्पाला आपला विरोधच असेल, असे स्पष्ट केले आहे. त्याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्याची चर्चा करून आपला विरोध पटवून देतील, असेही राऊत म्हणाले. मात्र, आजवरची भाजपची भूमिका लक्षात घेता हा प्रकल्प ज्या टप्प्यावर आहे, तेथे रद्द होईल, याची शक्यता नाही. त्यामुळे जैतापूरवासीयांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)