जैतापूर प्रकल्प हद्दपार करणारच : कदम
By Admin | Updated: May 26, 2015 00:47 IST2015-05-26T00:47:03+5:302015-05-26T00:47:15+5:30
विधानाचा विपर्यास केला गेल्याचा खुलासा

जैतापूर प्रकल्प हद्दपार करणारच : कदम
खेड : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. कोकण भकास करणे आणि मच्छिमार व्यवसाय नेस्तनाबूत करणे हे उद्देश कदापि साध्य होऊ देणार नाही. हा प्रकल्प हद्दपार करणार ही शिवसेनेची भूमिका आजही कायम आहे, अशा शब्दात राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
खेड येथील योगिता दंत महाविद्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही, त्याला स्थानिकांचा विरोध आहे आणि शिवसेनेचा स्थानिकांना पाठिंबा आहे, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केल्यामुळे बराच गदारोळ उडाला होता. आपल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ लावला असून, जैतापूर प्रकल्पाबाबतची माझी आणि शिवसेनेची भूमिका आजही कायम असल्याचे त्यांनी म्हटले.