जाधव-कदम वादात चिपळूणची वाट लागली

By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T23:24:24+5:302015-11-04T00:08:28+5:30

राजू देवळेकर : सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयच नसल्याची बोचरी टीका

The Jadhav-Kadam debate was overwhelming | जाधव-कदम वादात चिपळूणची वाट लागली

जाधव-कदम वादात चिपळूणची वाट लागली

चिपळूण : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यातील वादामुळे शहराच्या विकासाची वाट लागली आहे, असा आरोप करतानाच सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक भानगडी आहेत. त्यांच्यात समन्वय नसल्याने ते कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत, असे नगर परिषदेचे गटनेते राजू देवळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांचे विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. याचा गांभीर्याने विचार करुन नियोजन करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. त्यांच्यामध्ये भानगडी सुरु आहेत. आपापसात आरोप-प्रत्यारोप करण्यात ते गुंतले आहेत. गेले आठ महिने विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. आम्ही विरोधक असलो तरी केवळ विरोधाला विरोध करत नाही. सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, शहराचा विकास करण्यावर आमचा भर आहे. परंतु, सत्ताधारीच हतबल असल्याने विकास खुंटला आहे, असेही देवळेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला नगरसेवक शशिकांत मोदी, माधुरी पोटे, सुनील कुलकर्णी, राकेश देवळेकर, यतीन कानडे, विकी नरळकर आदी उपस्थित होते.
शहर विकासासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. आवश्यक तेथे नागरिकांच्यावतीने आवाज उठवला, तीव्र विरोध केला. विविध विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांबरोबर चर्चा केली. शिष्टमंडळेही नेली. तरीही त्यांच्यामध्ये फरक नाही. आता यांच्यापुढे काय करायचे, हा प्रश्न आहे. विकासाचा पाठपुरावा करुन प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. खासदार विनायक राऊत रामतीर्थ तलावाच्या सुशोभिकरणासाठी निधी देणार आहेत. तीन महिने झाले तरी त्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. आता सत्ताधाऱ्यांनी पत्र मागितल्यामुळे आम्ही पत्रही दिले आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पालिकेला भेट देऊन निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव त्यांनी मागितले आहेत. परंतु, कौन्सिलमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना त्यांनी चालढकल केली, हे शोभादायक नाही. इनायत मुकादम यांच्याबाबतचा प्रकार हा शहराला काळिमा फासणारा आहे. ते सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असताना त्यांच्यावर कारवाई व्हावी, हे अयोग्य वाटते. नगरसेवक लियाकत शाह यांना व्हीप बजवावा लागतो. सदस्यांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिला नाही. अनेक प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत. नागरिकांना हे माहीत आहे. सत्ताधाऱ्यांनी एकही विकासकाम केले नसल्याने ताबडतोब खुर्च्या खाली व सत्ता सोडा, असे आव्हान देवळेकर यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)

गटनेते असूनही आपण पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या बैठकीला नगर परिषदेत उपस्थित राहिला नाहीत, असे विचारता ते म्हणाले, याबाबतचा खुलासा माझे वरिष्ठ नेते करतील, तर शहरप्रमुख म्हणून आपली निवड झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याविरोधी तक्रार केली आहे, असे निदर्शनास आणता तसे काही नाही, असेही देवळेकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: The Jadhav-Kadam debate was overwhelming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.