जे. के. फाईल्समधील कामगारांनी केले काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:24+5:302021-04-24T04:32:24+5:30

चिपळूण : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील जे. के. ...

J. K. The work done by the workers in the files stopped | जे. के. फाईल्समधील कामगारांनी केले काम बंद

जे. के. फाईल्समधील कामगारांनी केले काम बंद

चिपळूण : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील जे. के. फाईल्समधील व्यवस्थापकीय अधिकारी सुहास पालांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे येथील कामगारांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपनीत २ मेपर्यंत न जाण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. शुक्रवारी कंत्राटी अथवा नियमित कामगार कंपनीत गेलेच नाहीत.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी जे. के. फाईल्स कंपनीला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कंपनीतील प्रत्येक कामगाराची काेराेना चाचणी करूनच त्यांना कामावर घ्यावे, अशी सूचना केली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण नियमितपणे मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. राज्य सरकारने अद्याप औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत. एमआयडीसीतील सर्व उद्योग सुरू आहेत. तालुक्यातील गाणे खडपोली येथील जे. के. फाईल्समधील एका अधिकाऱ्याचे कोरोनाने निधन झाले. तिन्ही पाळीत काम करणारे सुमारे ७०० कामगार कंपनीत कार्यरत आहेत. जवळचे सहकारी गेल्याने कामगारांच्या मनात भीती निर्माण झाली. यावरून कामगारांनी संघटीत होत चर्चा केली.

कामगारांच्या सुरक्षेची कोणती जबाबदारी घेणार, असा प्रश्न एकत्र जमाव करून विचारला जात होता.

त्यादृष्टीने इंजिनिअरिंग वर्कर असोसिएशन या मान्यताप्राप्त युनियनशी चर्चा सुरू होती. कामगार प्रतिनिधीकडून कंपनी कोणती व्यवस्था करत आहे, याबाबत माहिती देण्यात आली. तथापि कोरोना साखळी आपण तोडूया, अशी भूमिका घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी आलेले कायम व कंत्राटी कामगार घरी निघून गेले. कामगारांच्या मनात भीती व अविश्वास वातावरण निर्माण होत गेल्याने हा निर्णय झाला.

व्यवस्थापन युनियन प्रतिनिधींसमवेत चर्चा करत उत्पादन सुरू करण्याविषयी प्रयत्न सुरू होते. कामगारांनी कंपनीत हजर राहावे, कामगारांची कोरोना चाचणी करण्यात येईल. तसेच कंपनीत कार्यरत असताना कामगारांची आरोग्य काळजी घेतली जाईल, असे आश्‍वासन कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आले होते. कामगारांनी कामावर हजर होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे शनिवारी ठेकेदारी तत्त्वावरील कामगार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: J. K. The work done by the workers in the files stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.