आयटीआयधारकांना मिळणार दहावी, बारावीचे प्रमाणपत्र : निर्णय अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:39 PM2019-01-29T14:39:21+5:302019-01-29T14:42:20+5:30

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे आयटीआय संस्थांना आता इंडेक्स क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या जुलैपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी/बारावीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

ITI holders will get Class X, HSC certificate: Decision implementation | आयटीआयधारकांना मिळणार दहावी, बारावीचे प्रमाणपत्र : निर्णय अंमलबजावणी

आयटीआयधारकांना मिळणार दहावी, बारावीचे प्रमाणपत्र : निर्णय अंमलबजावणी

googlenewsNext
ठळक मुद्देआयटीआयधारकांना मिळणार दहावी, बारावीचे प्रमाणपत्र : निर्णय अंमलबजावणीमंडळातर्फे आयटीआय संस्थांना इंडेक्स क्रमांक

रत्नागिरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे आयटीआय संस्थांना आता इंडेक्स क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या जुलैपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी/बारावीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

शासकीय अथवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राज्यभरात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिकत असतात. एक ते दोन वर्षाच्या रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणानंतर मिळणारा रोजगार अथवा व्यवसाय सुरू करण्याची संधी यामुळे आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

राज्य मंडळाकडून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यां विद्यार्थ्यांना दहावी/बारावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे अकरावी किंवा पदवीसाठी कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांच्या पुढील अभ्यासक्रमांसाठी हे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. राज्य शासनाने जून २०१८मध्ये याबाबतचे परिपत्रक काढले होते. मात्र, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही आता सुरू झाली आहे.

दहावी, बारावीची परीक्षा येत्या मार्च/एप्रिलमध्ये होणार आहेत. त्यानंतर पुन्हा जुलै २०१९मध्ये राज्य मंडळाकडून पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना राज्य मंडळाच्या विभागीय कार्यालयांकडून इंडेक्स क्रमांक दिला जाणार आहे.

राज्य मंडळाच्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणे बेस्ट फाइव्ह या सुविधेचाही लाभ आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आयटीआयचे चार विषय व राज्य मंडळाचे भाषा विषय यातील पाच विषयांच्या कमाल गुणांनुसार गुणपत्रिका दिली जाणार आहे.

मार्च/एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी/बारावीचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. मात्र, आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाचे दोन भाषा विषय व ग्रेडच्या परीक्षा (पर्यावरण, आरोग्य शिक्षण) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

उर्वरित विषयांसाठी ते शिकत असलेल्या अभ्यासक्रमाचे विषय त्यांना निवडता येणार आहेत. आठवी उत्तीर्ण अथवा दहावी अनुत्तीर्ण प्रवेश पात्रता असलेल्या आयटीआय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना केवळ दहावीची मराठी, इंग्रजी विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर दहावी उत्तीर्ण पात्रता असणाºया अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना बारावीचे मराठी व इंग्रजी भाषेचे पेपर द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरण, आरोग्य आदींच्या ग्रेड परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागणार आहेत.

रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राबरोबरच दहावी, बारावी उत्तीर्णतेची संधी यामुळे उपलब्ध होणार असून, भविष्यात या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यावर्षी जुलै महिन्यापासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देता येणार आहे.

Web Title: ITI holders will get Class X, HSC certificate: Decision implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.