सावर्डेत सिंगल पिलर पूल न झाल्यास काम करू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST2021-09-11T04:31:53+5:302021-09-11T04:31:53+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेत भराव पूल रद्द करून सिंगल पिलर पूल होण्यासाठी सावर्डेवासीयांनी राष्ट्रीय महामार्गाच्या चिपळूण ...

सावर्डेत सिंगल पिलर पूल न झाल्यास काम करू देणार नाही
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेत भराव पूल रद्द करून सिंगल पिलर पूल होण्यासाठी सावर्डेवासीयांनी राष्ट्रीय महामार्गाच्या चिपळूण कार्यालयावर धडक दिली. सिंगल पिलर पूल न झाल्यास सर्व ग्रामस्थ सावर्डे बाजारपेठेमधील रुंदीकरणाचे काम करू देणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.
सावर्डे परिसरातील ८० गावे येथील बाजारपेठेस जोडली गेली आहेत. सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील सावर्डे बाजारपेठेमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या बाजारपेठेत महामार्ग चौपदरीकरणांतर्गत मंजूर असलेले सलग दोन भुयारी मार्ग तेथे बांधण्यात येणार आहेत. मात्र, बंदिस्त भिंतीमुळे येथील सर्व व्यावसायिकांच्या व आजूबाजूच्या जोडल्या गेलेल्या सर्व गावांतील स्थानिक लोकांना दळणवळण करण्याच्या दृष्टीने खूपच गैरसोयीचे होत आहे. या ठिकाणी मंजूर असलेल्या भराव पुलाऐवजी या बाजारपेठेत सिंगल पिलर उड्डाण पूल व्हावा. यासाठी सर्व ग्रामस्थ अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सावर्डेमधील पदाधिकारी, ग्रामस्थ यांची २५ एप्रिल २०१८ रोजी बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागास भराव पूल रद्द करून सिंगल पिलर उड्डाण पूल करण्यासाठी निर्देश दिले होते. तरीही याबाबत शासन स्तरावरून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. अद्याप हा विषय प्रलंबित आहे. हा भराव पूल रद्द न झाल्यास सावर्डे बाजारपेठेचे दोन भागांमध्ये विभाजन होऊन विभागातील ९० टक्के व्यापाऱ्यांचा व्यवसाय धोक्यात येणार आहे.
सावर्डे हे मध्यवर्ती ठिकाण असून, लगतच्या साधारणतः ८० गावांची बाजारपेठ आहे. त्यामुळे सावर्डे विभागातील सर्व व्यापारी व आजूबाजूच्या जोडले गेलेल्या सर्व गावांतील स्थानिक लोकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. त्यासाठी या ठिकाणी सिंगल पिलर पूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना सावर्डेच्या सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, माजी सभापती विजय गुजर, माजी सरपंच शांताराम बागवे, शौकत माखजनकर, सदस्य अजित कोकाटे, विजय बागवे, समिया मोडक, सुप्रिया सावंत, संदीप खेराडे, विष्णुपंत सावर्डेकर, रफिक मोडक, सूर्यकांत चव्हाण, सागर सावंत, अस्लम काद्री, मुजीप काद्री, मुजीप पटेल, अजहर गोलंदाज उपस्थित होते.