मच्छिमारांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने माहिती दिल्यास सतर्कता बाळगणे शक्य होईल : अमोघ शुक्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST2021-08-15T04:32:22+5:302021-08-15T04:32:22+5:30
रत्नागिरी : समुद्रातील अविरत वावरामुळे मच्छीमार समुदायाची समुद्रातील प्रत्येक बारीक घटनांवर नजर असते. मच्छिमारांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती ...

मच्छिमारांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने माहिती दिल्यास सतर्कता बाळगणे शक्य होईल : अमोघ शुक्ला
रत्नागिरी : समुद्रातील अविरत वावरामुळे मच्छीमार समुदायाची समुद्रातील प्रत्येक बारीक घटनांवर नजर असते. मच्छिमारांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती योग्यवेळी दिल्यास समुद्रात जीविताचे रक्षण करणे आणि राष्ट्रविघातक घटकांचे गुपित उद्दिष्ट साध्य करण्यापासून रोखणे, आदी उपाययोजना करणे शक्य होईल. तसेच सतर्कता बाळगता येईल, असे प्रतिपादन तटरक्षक दलाचे सहाय्यक समादेशक अमोघ शुक्ला यांनी केले.
यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याला पंच्यात्तर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने तटरक्षक दल ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रम राबवत आहे. या अनुषंगाने गुरूवारी दुपारी रत्नागिरीनजीकच्या भाट्ये गावात विशेष समुदाय संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शुक्ला यांनी मार्गदर्शन केले. भारतीय तटरक्षक अवस्थानने यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची रूपरेषा तयार केली असून, त्यात निबंध स्पर्धा, समुदाय संवाद कार्यक्रम, वृक्ष लागवड कार्यक्रम आदींचा समावेश आहे. यावेळी अग्निशमन उपाययोजनेचे प्रात्यक्षिकदेखील करण्यात आले.
तटरक्षक दलातर्फे आयोजित या विशेष समुदाय संवाद कार्यक्रमाद्वारे बोटीमध्ये अग्निशमन उपाययोजना, डीएटी उपकरणाचे महत्त्व व प्रात्यक्षिक, जीवनरक्षक उपकरणांचे महत्त्व व प्रात्यक्षिक, सामूहिक मच्छिमारीचे महत्त्व, सागरी संचार उपकरणांचे महत्त्व व प्रात्यक्षिक, संकट काळात अडकलेल्या मच्छिमारांना मदत पुरविण्यासंदर्भात तटरक्षक दलाचे कार्य व टोल फ्री संपर्क क्रमांक, स्वच्छ सागर अभियानाबाबत मार्गदर्शन, सागरातील सुरक्षेसंबंधी जागरूकता, बायोमेट्रिक ओळखपत्र बाळगणे आदीबद्दल मच्छिमारांना माहिती देण्यात आली. यावेळी अग्निशमन उपाययोजनेचे प्रात्यक्षिकदेखील करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन भाट्ये मच्छीमार सोसायटीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अरमान उस्मान भाटकर, सदस्य अब्दुल लतीफ भाटकर, आसिफ भाटकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष इब्राहीम वाडकर व इतर २५ मच्छीमार उपस्थित होते. रिलायन्स फाऊंडेशनचे राजेश कांबळे, सागरी पोलीस दलाचे उपनिरीक्षक आर. आर. दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमावेळी कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांची खबरदारी घेतली होती.