अनाथ मुलांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By Admin | Updated: May 20, 2015 23:58 IST2015-05-20T23:40:42+5:302015-05-20T23:58:26+5:30

आश्रमात पिण्यास पाणी नाही. तसेच नगरपालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे

The issue of water for orphans is serious | अनाथ मुलांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

अनाथ मुलांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

मालवण : मालवण शहरातील फातिमा आश्रमाच्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याने येथील अनाथ मुलांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून या मुलांना पायपीट करून इतर ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे.
मालवण तहसील कचेरी रोडवर असलेल्या फातिमा आश्रम येथे अनाथ मुलांना शिक्षण व राहण्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी यावर्षी ३५ मुले व सिस्टर तसेच मदतनीस मिळून ४० ते ४५ सदस्य या आश्रमात आहेत. आश्रम परिसरात पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. परंतु उन्हाळ्यात तिचे पाणी कमी झाले असून ते क्षारयुक्त बनले आहे. पाणी पिण्यास अयोग्य बनल्याने पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आश्रमाकडून नगरपालिकेकडे नळपाणी योजनेसाठी पैसे भरण्यात आले आहेत. मात्र, उन्हाळा संपून पावसाळा तोंडावर आला तरीही नळजोडणी पालिकेने केलेली नाही.
पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने येथील अनाथ मुलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. आश्रमात पिण्यास पाणी नाही. तसेच नगरपालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे अशी तक्रार आश्रमाच्यावतीने शिवसेना उपशहरप्रमुख सन्मेश परब यांच्याकडे करण्यात आली. याप्रश्नी तत्काळ लक्ष घालत शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातून व शहर विकास आघाडीच्या सहकार्याने या प्रश्नी नगरपरिषदेला जाब विचारून तत्काळ पाणी उपलब्ध केले जाईल असे सन्मेश परब यांनी सांगितले.
याबाबत नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधला असता आश्रमाकडून पैसे भरणा झाले आहेत. मात्र, कनेक्शनपासून आश्रमापर्यंत पाईपलाईन टाकण्याबाबत आश्रमाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नळजोडणीस दिरंगाई झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The issue of water for orphans is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.