लोटे वसाहतीत सांडपाण्याचा प्रश्न
By Admin | Updated: July 9, 2015 00:05 IST2015-07-09T00:05:23+5:302015-07-09T00:05:23+5:30
प्रकार सुरुच : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही डोळेझाक

लोटे वसाहतीत सांडपाण्याचा प्रश्न
आवाशी : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सध्या रासायनिक सांडपाणी सोडण्याचा प्रकार कंपन्यांनी सुरूच ठेवला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करुनही डोळेझाक होत असल्याचा आरोप लोटे ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेंद्र चाळकेंसह ग्रामस्थांनी केला आहे.पावसाळा सुरु झाला की, इथल्या रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न दरवर्षी ऐरणीवर येतो. प्रत्येक कंपनीने सांडपाण्यावर रासायनिक प्रक्रिया करुन सीईटीपीत पाणी सोडले पाहिजे. मात्र, तसे न होता बहुतांश कंपन्यातून हे सांडपाणी विनाप्रक्रिया आवाराबाहेर नाल्यातून सोडले जात आहे. त्यामुळे वर्षातून एकदाच होणारी भातशेती धोक्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत दूषित झाले आहेत, तर पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. मागील आठवडाभरात इथल्या पाच कंपन्यांनी असे उघड्यावर सांडपाणी सोडल्याचे ग्रामस्थांसह सरपंचांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांची नावे समोर येत आहेत. या सर्व ठिकाणांची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे येथील अधिकारी अभिजीत कसबे यांनी सरपंचांसमवेत करुन पाण्याचे नमुने घेतले आहेत. तरीही या कंपन्यांवर कोणाचाच वचक नसल्याची बाब समोर येत आहे.
एका केमिकल्स कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याची कसबे यांनी सोमवारी पाहणी करुन पंचयादी घातली. मात्र, त्यानंतर एका कंपनीच्या लगतच्या नाल्यातून येणाऱ्या सांडपाण्याची तक्रार भ्रमणध्वनीवरुन सरपंच चाळके यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी मोरे यांच्याकडे दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन कार्यालयात येऊन तक्रार द्या, मग काय ते बघू, असे सांगितल्याने वातावरण बिघडले आहे. (वार्ताहर)
लोटे येथील एका कंपनीच्या सांडपाण्याची तक्रारही सरपंचांनी केली होती. सलग दोन वर्षांच्या पावसाळ्यात तसाच प्रकार घडल्याने या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन घेण्यास बंदी घातली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.