मोठ्या गुंतवणूकदारांचीही चौकशी
By Admin | Updated: June 24, 2014 01:42 IST2014-06-24T01:27:31+5:302014-06-24T01:42:14+5:30
‘सॅफरॉन’प्रश्नी उदय सामंत यांची घोषणा

मोठ्या गुंतवणूकदारांचीही चौकशी
रत्नागिरी : सॅफरॉन कंपनीत नागरिकांना पैसे गुंतविण्यासाठी भाग पाडणाऱ्या मध्यस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पण, ज्यांनी जादाचे पैसे या कंपनीत गुंतविले, ते पैसे कोठून आले, याचीही चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबाराविषयी माहिती देण्याकरिता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सहावा जनता दरबार आयोजित केला होेता. या जनता दरबारात एकूण ३० तक्रार अर्ज दाखल झाले.
सध्या सॅफरॉन कंपनीतील गोंधळ गाजत आहे. रत्नागिरीकरांच्या फसवणुकीबाबत पोलिसांची भूमिका काय, असा सवाल करणारा अर्ज या जनता दरबारात सादर झाला. याबाबत पालकमंत्री म्हणाले की, या कंपनीबाबत सव्वा वर्षापूर्वी पोलिसांकडे लेखी तक्रार आली होती. मात्र, त्याबाबत कारवाई का झाली नाही, याची चौकशी होईलच. पण या कंपनीकडे पैसे गुंतविण्यासाठी ज्या मध्यस्थांनी लोकांना प्रवृत्त केले, त्यांचीही चौकशी होऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले असल्याचे सामंत म्हणाले. याप्रकरणी पोलीस आराखडा तयार करणार असून, त्यात अधिकचे पैसे भरणाऱ्यांनी ते कुठून आणले, त्याचीही चौकशी होणार असल्याची माहितीही दिली.
अतिरिक्त शिक्षक बदल्यांबाबत या ३२१ शिक्षकांमध्ये तसेच ७४ निम्नशिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, ते केवळ १ मार्च २०१४ च्या अध्यादेशाची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्यामुळे. परंतु या शिक्षकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्यात आल्याने आता या शिक्षकांना यात संधी मिळणार आहे. तसेच ७४ निम्नशिक्षकांना तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. यासंदर्भात ३० रोजी शिक्षण उपसंचालक रत्नागिरीत येणार असून, त्यांच्याशी चर्चा होणार असल्याचेही सामंत म्हणाले.
यावेळी काही खासगी शाळा अवास्तव शुल्क वाढ करतात, अशा शाळांच्या पालकांनी रितसर तक्रार केल्यास त्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले. सेतूतील प्रलंबित दाखल्यांचा निपटारा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत दर आठवड्याला आता दाखल्यांच्या निपटाऱ्याबाबत आढावा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. तसेच सध्या शाळा, महाविद्यालये येथे शिबिरे घेऊन दाखले दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)