‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी करा

By Admin | Updated: April 4, 2015 00:14 IST2015-04-03T21:01:01+5:302015-04-04T00:14:54+5:30

बोगस पदवी प्रकरण : तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचाही हात

Investigate 'those' officers | ‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी करा

‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी करा

रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठाच्या बोगस पदवीधारकांना पदोन्नती कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत देण्यात आली. त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी लक्ष घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अलाहाबाद विद्यापीठाकडून बोगस पदव्या धारण करुन जिल्हा परिषदेची आर्थिक लूट सुरु होती. बोगस पदव्यांच्या आधार घेऊन पदोन्नतीच्या माध्यमातून हजारो रुपयांची वेतनवाढ मिळवली. तसेच, काही शिक्षक तर या बोगस पदव्या घेऊन साहेबगिरी मिरवित होते. अलाहाबाद विद्यापीठाची पदवी ४० ते ५० हजार रुपयांना मिळवून पदोन्नती देण्यात आलेल्या शिक्षकांच्या पाठीवर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा हात होता. या पदवीधारकांना पदोन्नती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली हे निश्चित आहे. बोगस पदव्या धारण करणाऱ्या पदवीधारक शिक्षकांना प्रोत्साहन देऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तत्कालीन अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे पैसे देऊन पदव्या धारण केलेल्या शिक्षकांनी पदोन्नती मिळवण्यासाठीही पैसे मोजले होते. केवळ बोगस पदवीधारकांना पदावनत करुन चालणार नाही, तर ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीमध्ये या पदवीधारकांना पदोन्नती देण्यात आली. त्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (शहर वार्ताहर)

संबंधित शिक्षकांची शिक्षक म्हणून नेमणूक निवड मंडळामार्फत करण्यात आली. मात्र, त्यानंतर पदोन्नती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करणे आवश्यक होते. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही.
- विजयकुमार काळम,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

Web Title: Investigate 'those' officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.