अपघातात उलटली जेटीत वाहने
By Admin | Updated: November 13, 2016 23:24 IST2016-11-13T23:24:42+5:302016-11-13T23:24:42+5:30
मिरकरवाडा येथील दुर्घटना : एक जखमी; मोटार मागे घेताना टेम्पोला धडक

अपघातात उलटली जेटीत वाहने
रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर चारचाकी गाडी व रिक्षा टेम्पोची धडक बसून दोन्ही वाहने जेटीत पडली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत हाजी मलंग हुसेन साहब (४४, मुरूगवाडा, रत्नागिरी) जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर क्रेनच्या सहाय्याने या गाड्या बाहेर काढण्यात तेथील नागरिकांना यश आले. ही घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. दादा सावंत हे पत्नी व मुलाला सोबत इस्टीम चारचाकी गाडी (एमएच-०८-सी-७३६०) घेऊन मिरकरवाडा जेटीवर मासे आणण्यासाठी गेले होते. सकाळी १० च्या सुमारास ते मिरकरवाडाजेटी येथे गेले. आपल्या मुलाला व पत्नीला गाडीतून उतरवून ते गाडी मागे घेत होते. त्याचवेळी पाठीमागे हाजी हुसेन साहब यांचा रिक्षा टेम्पो पार्क करून ठेवला होता व ते आतमध्ये बसले होते. दादा सावंत हे गाडी मागे घेत असताना त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि इस्टीम कारची रिक्षा टेम्पोला जोरदार धडक बसली.
क्षणातच दोन्ही वाहने जेटीवरून खाली पडली. या दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये हाजी हुसेन साहब हे जखमी झाले. मिरकरवाडा जेटी येथे केमिकल मिश्रीत पाणी व गाळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही वाहने गाळामध्ये अडकत चालली होती. त्यामुळे तेथील काही खलाशांनी पाण्यात उड्या मारून दादा सांवत व हाजी हुसेन साहब यांना पाण्यातून बाहेर काढले. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या हाजी यांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही दोन्ही वाहने खाऱ्या पाण्यात पडल्यामुळे या वाहनांचे मोठ्या-प्रमाणात नुकसान झाले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही वाहने क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. (वार्ताहर)