इंटरनेट युगातही ‘चोपडी’ कायम
By Admin | Updated: October 20, 2014 22:30 IST2014-10-20T22:05:58+5:302014-10-20T22:30:46+5:30
वह्या बाजारात : पूर्वीची परंपरा पुढे सुरू, लक्ष्मीपूजनपासून नव्या चोपड्या

इंटरनेट युगातही ‘चोपडी’ कायम
रत्नागिरी : इंटरनेट, संगणकीय युगातही लक्ष्मी पूजनासाठी खास ‘चोपडी’ विकत घेतली जाते. धनाबरोबर वही पूजन, चोपडी पूजन करण्यात येते. त्यामुळे वही पूजनासाठी, चोपडी पूजनासाठी लागणाऱ्या वह्या सध्या बाजारात विक्रीला आल्या आहेत.
संगणक येण्यापूर्वी वह्यांवर, चोपडीवर व्यावसायिक मंडळी हिशेब लिहीत असत. दररोजचे हिशेब, वसुली, येणे यांचे लिखाण केले जात असे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवीन चोपडी किंवा वहीचे पूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तिचा वापर सुरू व्हायचा. मात्र, संगणक आल्यानंतर त्यावर हिशेब मांडले जाऊ लागले. केवळ पूजनापुरती वही विकत घेतली जायची. मात्र, संगणकावर येणारे व्हायरस किंवा मॅटर करप्ट होत असल्याचा धोका लक्षात घेऊन पुन्हा चोपडीवर लिखाण करणे सुरू केले आहे. त्यामुळे वह्याची मागणी वाढली आहे.
छोट्या वह्या १५ ते २० रूपये, त्याहून मोठ्या ४५ ते ५० रूपये, दैनंदिन व्यवहाराच्या १७५ पासून ५०० रूपयांपर्यंत किमतीच्या वह्या विक्रीला उपलब्ध आहेत. गतवर्षीपेक्षा वह्यांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ झाली आहे. संगणकावर वर्षानुवर्षाचे व्यवहार सेव्ह करणे सोपे ठरते. परंतु व्हायरस अथवा तांत्रिक समस्येमुळे फाईल बाद झाली तर मात्र वहीवरील हिशेबाची माहिती उपयुक्त ठरते. त्यामुळे हिशेब वह्यांवर लिहिण्याकडे व्यापारीवर्गाचा कल अधिक आहे. त्यामुळे गुलाबी रंगाच्या वह्यांवर महालक्ष्मी किंवा गणपती चित्राच्या मुखपृष्ठाच्या वह्यांना विशेष मागणी होत आहे.
आजही किरकोळ दुकानदार, विविध व्यावसायिक, सराफ आदी चोपडी पूजन विधीवत करताना दिसतात. ही परंपरा यापुढे सुरू राहणार असल्याचे येथील जनता ग्रंथ भांडारचे सुरेंद्र रेडीज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
पूर्वी वह्यांवर, चोपडीवर लिहिला जायचा हिशोब
संगणकाच्या युगात आजही चोपड्यांना महत्वाचे स्थान
वह्यांची मागणी वाढली
लक्ष्मी पूजनानंतर दुसऱ्या दिवशी सुरू होतो हिशोब
गणपती, सराफ यांच्याकडून मागणी