हुशार विद्यार्थ्यांनी चांगले पर्याय निवडावेत : आरोटे
By Admin | Updated: February 2, 2015 23:46 IST2015-02-02T22:43:54+5:302015-02-02T23:46:23+5:30
विज्ञानरंजन स्पर्धा परीक्षा : ५४ बालवैज्ञानिक हे जिल्ह्याचे क्रीमिलेअर असल्याचे गौरवोद्गार

हुशार विद्यार्थ्यांनी चांगले पर्याय निवडावेत : आरोटे
रत्नागिरी : जिल्हास्तरीय विज्ञानरंजन स्पर्धा परीक्षेत २७ हजारांमधून निवड झालेले बक्षीसपात्र ५४ बालवैज्ञानिक हे जिल्ह्याचे क्रीमिलेअर आहेत. या हुशार मुलांनी चाकोरीबद्ध शिक्षण प्रक्रियेत न अडकता चाकोरीबाहेरील विविध क्षेत्रांचा पर्याय निवडून उच्च पदे भूषवत देशसेवा करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय आरोटे यांनी रत्नागिरी येथील बक्षीस वितरण सोहळ्यात केले.जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरीच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. येथील पटवर्धन हायस्कूलच्या प्राथमिक विभागात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी चपखल उदाहरणांद्वारे आयएएस दर्जाच्या मुलाखतींचे स्वरुपही उलगडले. तसेच केवळ मेडिकल, इंजिनिअरिंगच्या मळलेल्या वाटेने न जाण्याचे आवाहन करुन त्यांनी अवकाश संशोधन संस्था, टाटा आॅलिम्पियाड, शिष्यवृत्ती देणाऱ्या देशी-विदेशी संस्था, आयशर आदी नामांकित संस्थांमधील प्रवेश प्रक्रियांविषयी दुर्लभ असे मार्गदर्शन केले. यावेळी अरुण मुळ्ये, सिद्धेश्वर, डोके, संतोष मोहिते यांनीही मार्गदर्शन केले.सोहळ्यास मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, राज्य कार्यवाह अरुण मुळ्ये, राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वर डोके, जिल्हा उपाध्यक्ष आर. व्ही. जानकर, कार्यवाह प्रभाकर सनगरे, कोषाध्यक्ष एम. के. पाटील, सहकार्यवाह मनोज घाग, स्पर्धाप्रमुख संतोष मोहिते, एच. व्ही. सुतार यांच्यासह जिल्हाभरातून आलेले बक्षीसपात्र स्पर्धक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हास्तरावर निवडले गेलेले प्राथमिक गटातील पाच स्पर्धक १) अद्वैत हातखंबकर (सावर्डे), सिद्धी जोग (जयगड), साक्षी घाग (खेड), सोहम पारेख (मंडणगड), प्रांजल गोसावी (संगमेश्वर) तसेच माध्यमिक गटातील अनुष्का घाग (कामथे), रियाज नेवरेकर (लांजा), वेदांत बेडेकर (करजगाव), अमृता तोडणकर (गावखडी), प्रणाली कांबळे (कोंडगाव) यांना तसेच तालुकास्तरावरील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत अनेकांनी भाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)