उपशिक्षकाला मूळ शाळेत जाण्याचे आदेश

By Admin | Updated: July 15, 2016 22:36 IST2016-07-15T22:23:14+5:302016-07-15T22:36:47+5:30

शिक्षणाधिकाऱ्यांची भेट : देवरूख कांगणेवाडी शाळेतील वाद, समितीचा पाठपुरावा

The instructor to go to the original school | उपशिक्षकाला मूळ शाळेत जाण्याचे आदेश

उपशिक्षकाला मूळ शाळेत जाण्याचे आदेश

देवरूख : शहरातील जिल्हा परिषद शाळा, कांगणेवाडीच्या आस्थापनेवरील मूळ शिक्षिका ज्योती गाजुलवार यांना या शाळेत नियमित करण्याबरोबरच जादा ठरलेले श्रीकांत शिंदे या उपशिक्षकाला फणसवळे या मूळ शाळेत जाण्याचा आदेश शाळा भेटी प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने आवाज उठवून पाठपुरावा केला होता. यामुळे शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या लढ्याला यश आले आहे.
शाळेच्या मूळ शिक्षिका गाजुलवार घरगुती अडचणींमुळे नऊ महिन्यांच्या दीर्घ रजेवर होत्या. रजेचा कालावधी संपल्यावर त्या पुन्हा कांगणेवाडी शाळेत रूजू झाल्या. याच सुमारास श्रीकांत शिंदे या उपशिक्षकाची कामगिरीवर या शाळेत नियुक्ती करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र पेंढारी व समिती सदस्यांनी कायमस्वरूपी शिक्षक म्हणून आधीपासून असलेल्या शिक्षिका गाजुलवार यांचीच नेमणूक करावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे समितीच्या माध्यमातून केली होती.
शाळा व्यवस्थापन समितीने केलेल्या मागणीची दखल न घेतल्यास सर्व ग्रामस्थांसह पंचायत समिती कार्यालयावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पेंढारी यांनी दिला होता. गेले कित्येक महिने हा विषय प्रलंबित राहिला होता.
समितीने केलेल्या मागणीची दखल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी घेतली आहे. त्यांनी शनिवारी शाळेला भेट दिली. यात व्यवस्थापन समितीचे म्हणणे ऐकून घेत गाजुलवार या शिक्षिकेची शाळेत नियुक्ती करण्याबरोबरच जादा शिक्षक ठरलेले श्रीकांत शिंदे यांना फणसवळे या मूळ शाळेत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार शिंदे हे शनिवारीच कांगणवाडी शाळेतून मोकळे होऊन आदेशाप्रमाणे फणसवळे शाळेत रूजू झाले.
व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार गाजुलवार या शिक्षिका शाळेत राहिल्याने समितीने समाधान व्यक्त करुन योग्य निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे शिक्षक नियुक्तीबाबत उडालेला गोंधळ शांत झाला आहे. (प्रतिनिधी)


समितीचा लढा
जिल्हा परिषदेच्या कांगणेवाडी शाळेतील आस्थापनेवरील मूळ शिक्षिकेला नियमित करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली होती. त्याचबरोबर उपशिक्षकाला मूळ शाळेत पाठवण्याचीदेखील मागणी करण्यात आली होती. या मागण्या शिक्षण विभागाने मान्य केल्या आहेत.

Web Title: The instructor to go to the original school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.