क्राॅकोडाइल पार्क प्रकल्पासाठी योगेश कदम यांच्याकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST2021-09-14T04:36:48+5:302021-09-14T04:36:48+5:30

खेड : शहरानजीकच्या जगबुडी नदीपात्रात बोटिंगची व्यवस्था करण्यासाठी व त्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी नगरविकास खात्याकडून नऊ कोटी रुपयांचा ...

Inspection by Yogesh Kadam for Krakodile Park Project | क्राॅकोडाइल पार्क प्रकल्पासाठी योगेश कदम यांच्याकडून पाहणी

क्राॅकोडाइल पार्क प्रकल्पासाठी योगेश कदम यांच्याकडून पाहणी

खेड : शहरानजीकच्या जगबुडी नदीपात्रात बोटिंगची व्यवस्था करण्यासाठी व त्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी नगरविकास खात्याकडून नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर झाल्याने आगामी कालावधीत या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जगबुडी नदी किनारी देवणे बंदर परिसरात आमदार कदम, मेरीटाइम बोर्ड, लघु पाटबंधारे विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली. यावेळी चिपळूण येथील उद्योजक रामशेठ रेडीज यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शहरानजीक जगबुडी नदीपात्र आणि परिसराला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे. त्यातच मुंबई - गोवा महामार्गावरील होणारे चौपदरीकरण, देवणे येथील नारंगी नदीवर झालेला पूल यामुळे खेड तालुका सौंदर्याने खुलत आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या सहकार्यातून शहराच्या मधून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात बोटिंग, पर्यटकांसाठी विश्रांतीगृह व मगर दर्शनासाठी क्राॅकोडाइल पार्क उभे राहावे यासाठी आमदार योगेश कदम यांनी प्रयत्न सुरू केले होते.

खेड शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि सुंदर खेड स्वच्छ खेडच्या संकल्पनेत भर टाकणाऱ्या, तसेच पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नऊ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यास हिरवा कंदील दिला. त्यामुळे आगामी काळात खेड बंदर परिसरात पर्यटकांना विश्रांतीसाठी विश्रांतीगृह, उपाहारगृह, बोटिंग आणि क्राॅकोडाइल पार्क उभे राहणार आहे.

पर्यटकांना थांबण्याची सुविधा, बोटिंग आणि क्राॅकोडाइल पार्क याचा पाठपुरावा करून हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आमदार कदम सतत प्रयत्नशील आहेत. बोट क्लब आणि क्राॅकोडाइल पार्कचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यामध्ये मगरीचा अधिवास, पार्कची उभारणी आणि प्रकल्पाची उभारणी करताना करावयाच्या उपाययोजना यावर विशेष चर्चा करण्यात आली.

................................

खेड जगबुडी नदी व किनारा परिसरात मगर व पक्षी विविधता असल्याने अनेक परदेशी पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतील यात शंका नाही. पर्यटक आणि पर्यटनातून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. विकासाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होईल. नगरपालिकेच्या तिजोरीत भर पडेल.

योगेश कदम, आमदार

Web Title: Inspection by Yogesh Kadam for Krakodile Park Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.