पावसाअभावी जिल्ह्यात लावणी खोळंबली
By Admin | Updated: June 27, 2014 01:08 IST2014-06-27T01:05:14+5:302014-06-27T01:08:05+5:30
पावसाने फिरवली पाठ : ९५ टक्के भात पेरणी पूर्ण, पुढची कामे मात्र रखडली

पावसाअभावी जिल्ह्यात लावणी खोळंबली
रत्नागिरी : जिल्ह्यातील ९५ टक्के भातपेरणी पूर्ण झाली आहे. मात्र पावसाच्या विलंबामुळे लावणीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात ७००० हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर १३०८ हेक्टर क्षेत्रावर नागलीची पेरणी झाली आहे. येत्या चार - पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर भातपिकाचे नुकसान होण्याची भीती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर भातपेरणीला सुरूवात केली होती. जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भाताला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र, जिल्ह्यात अधूनमधून पडणारा पाऊस पेरणीला सध्या तरी पूरक असल्याने आता रोपे चांगली उगवली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७००० हेक्टर क्षेत्रात भातपेरणी करण्यात आली आहे. १३०८ हेक्टर क्षेत्रात नागलीची पेरणी करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात नियमित नसला तरी सध्या अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पेरणीच्या कामात कुठलीच अडचण आली नाही. भातरोपे चांगली उगवली आहेत. त्यामुळे सध्या अधूनमधून पडणाऱ्या या पावसामुळे या रोपांचीही चांगली वाढ झाली आहे. सध्या पावसाला अनुकूल असे वातावरण जिल्ह्यात दिसू लागले असून, ३० तारखेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. मात्र, अधिकच लांबला तर मात्र, रोपे सुकून जाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली.
राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी तालुक्यातील काही ठिकाणी भातरोपांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तेथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयाकडून सायफरमेथ्रीन या कीटकनाशकाचा पुरवठा या क्षेत्रात करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.
संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पेरणीचे काम झाले असून, त्या तुलनेने गुहागर आणि मंडणगडमध्ये पेरणीचे प्रमाण कमी आहे. (प्रतिनिधी)