‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने कडवई नदीचा श्वास मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:57+5:302021-08-21T04:36:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : उन्हाळ्यात पाणीटंचाईचा आणि पावसाळ्यात पुराचा फटका बसत असलेल्या गावांच्या धडपडीतून अनेक गावांनी या समस्यांवर ...

With the initiative of ‘Umalati Prithvi Foundation’, the river Kadwai breathed a sigh of relief | ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने कडवई नदीचा श्वास मोकळा

‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने कडवई नदीचा श्वास मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : उन्हाळ्यात पाणीटंचाईचा आणि पावसाळ्यात पुराचा फटका बसत असलेल्या गावांच्या धडपडीतून अनेक गावांनी या समस्यांवर उपाययोजना केल्या आहेत. पुराच्या समस्येचा सामना करावा लागणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांनी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने गाळमुक्त नद्या - नाले ही मोहीम यशस्वी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच यंदा १०० वर्षांत झाली नाही अशी ढगफुटी होऊनही ही गावे पुरापासून सुरक्षित राहिली आहेत. यापैकी एक म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे गाव कडवई हे आहे. या गावातील मुंबईस्थित युवकांनी स्थापन केलेल्या ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या पुढाकाराने कडवईतील नदी गाळमुक्त झाली, त्याचबरोबर गावामध्ये जलसमृद्धीचे अनेक प्रकल्पही राबविण्यात आले आहेत.

वर्षानुवर्षे भरलेल्या गाळामुळे नद्यांचे पाणी घरांमध्ये - शेतीमध्ये घुसल्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. कडवई ग्रामस्थांना दरवर्षी या संकटाचा सामना करावा लागत असे. सुमारे १८ ते २० वाड्या असलेल्या या गावाची लोकसंख्या साडेपाच हजारांच्या आसपास आहे. राजकीयदृष्ट्या हे गाव महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, दुर्गम असलेल्या या गावामध्ये रोजगार संधी नसल्याने बहुतांश लोकांचे वास्तव्य मुंबई तसेच परदेशात आहे. परंतु, यापैकी काहींना आपल्या गावाबद्दल कमालीची आत्मीयता असल्याने गावाच्या विकासासाठी ही मंडळी काही ना काही धडपड करत असतात.

कडवईतील मुंबईस्थित आणि स्थानिक युवकांच्या संकल्पनेतून गावाच्या विकासासाठी ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’ची निर्मिती झाली. यात पुढाकार होता तो इरफान चिकटे, सादिक खान, अख्तर मोडक आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचा. सुरूवातीपासूनच या युवकांनी विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यातूनच गावातील नदीला गाळमुक्त करून पुराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा विचार पुढे आला. या युवकांनी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंउेशनच्या माध्यमातून कणकवली येथील एका गावात ११ किलाेमीटरचा गाळ केवळ ३० दिवसांत काढल्याचे स्वत: जाऊन पाहिले होते. त्यामुळे आपल्या गावातही ही मोहीम राबविण्याचा निर्धार केला. ‘नाम’चे कोकण विभाग समन्वयक समीर जानवलकर, तालुका प्रतिनिधी भगवंतसिंह चुंडावत यांच्या माध्यमातून अडीच किलोमीटर अंतरातील गाळ काढण्याचा निर्णय झाला. जलतज्ज्ञ डाॅ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश निवाते यांनी संपूर्ण आराखडा तयार केला. या मंडळींनी या ग्रामस्थांना हिंमत देत त्यांचे मनोबल वाढवले. त्याचबरोबर कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, निरजा फाऊंडेशनचे संचालक यशवंत मराठे यांचे योगदान महत्त्वाचे होते. मराठे यांनी संस्थेच्या माध्यमातून १० लाखांची मदत या उपक्रमासाठी केली.

प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. कडवई नदीतील अडीच किलाेमीटरचा गाळ उपसा करण्यासाठी ‘नाम’ने २ पोकलेन मशीन दिल्या. ग्रामस्थांच्या एकीतून सुमारे १५ लाखांचा निधीही गोळा झाला. ग्रामस्थ आणि नाम फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हा गाळ अवघ्या ४२ दिवसांत निघाला. त्यामुळे कडवई नदीचा श्वास गाळमुक्त झाला आहे.

चार बंधारेही पूर्ण...

एवढेच नव्हे तर ‘उमलती पृथ्वी फाऊंडेशन’च्या युवकांनी गावात ‘पाणी जिरवा, पाणी अडवा’ हा मंत्र जपत चार बंधाऱ्यांचे कामही हाती घेतले. त्यातील ३ बंधारे पूर्ण झाले असून, चाैथ्या बंधाऱ्याचे काम पावसामुळे अपूर्ण राहिले आहे. ते आता पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाची पाठीवर थाप...

रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कडवई येथे भेट देऊन गाळ उपशाची माहिती घेतली आणि या सर्वांचे काैतुक केले. एवढेच नव्हे तर प्रशासनाच्यावतीने एक पोकलेन मशीन देण्याचे जाहीर केले आणि त्याची पूर्तताही केली.

Web Title: With the initiative of ‘Umalati Prithvi Foundation’, the river Kadwai breathed a sigh of relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.