औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना मिळाले उत्पन्नाचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:05+5:302021-04-11T04:30:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : स्फोट आणि अपघातांमुळे लाेटे औद्योगिक वसाहत असुरक्षित झाली असली, शापदायी झाली असली तरी या ...

औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना मिळाले उत्पन्नाचे साधन
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : स्फोट आणि अपघातांमुळे लाेटे औद्योगिक वसाहत असुरक्षित झाली असली, शापदायी झाली असली तरी या औद्योगिक वसाहतीमुळेच हजारो लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. कारखानदारीमुळेच मनिऑर्डरवर अवलंबून असलेला हा परिसर स्वयंपूर्ण झाला आहे, हेही सत्य नाकारता येणार नाही.
लाेटेच्या उजाड माळावर १९८६/८७ सालापासून औद्योगिक वसाहत उभी राहू लागली. तोपर्यंत येथील रहिवासी शेतीच्या आधारानेच जगत होते. भातशेती हाच येथील प्रमुख व्यवसाय होता. प्रत्येक गावाच्या प्रत्येक वाडीतील प्रत्येक कुटुंबातील एकतरी व्यक्ती मुंबईत नोकरी करत होती आणि मनिऑर्डर हा जगण्याचा एक आधार होता. शेती आणि चाकरमानी मुंबईकर असेल ते घर सधन म्हणून ओळखले जात होते.
या माळरानावर कारखाने उभे राहू लागले आणि त्यानंतर स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळू लागले. ज्यांना मुंबईला जाणे शक्य नव्हते, ज्यांची स्वत:ची फारशी शेती नव्हती, अशा कुटुंबांमधील तरुणांना या कारखान्यांमुळे मोठा आधार मिळाला. काही कंपन्यांनी दहावीपेक्षा कमी शिकलेल्या मुलांनाही कंपन्यांमध्ये सामावून घेतले. त्यामुळे उत्पन्नाचे एस ठोस साधन बहुतांश कुटुंबांकडे आले.
कारखानदारीमुळे आवाशी, गुणदे, शेल्डी, लोटे, पीरलोटे सोनगाव, चिरणी, धामणदेवी, कोतवली, घाणेखुंट, असगणी, आयनी, लवेल, दाभिळ, बोरज या आसपासच्या गावांमधील दहावी पास/नापासांनाही रोजगार मिळू लागला. त्यामुध्ये जुनी नोसिल, एक्सेल, घरडा, यूएसव्ही, हिंदुस्थान युनिलिव्हर, पेठे निहॉन (आताची एम्को), बंद पडलेली सिरीन या कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. सुरुवातीच्या काळात मोजक्याच असलेल्या या कंपन्यांमध्ये अनेक गावांतील तरुणांना रोजगार मिळाला. घरच्या घरी राहून काम मिळाल्याने शेती सांभाळणेही त्यांना शक्य झाले.
१९९४/९५पासून या वसाहतीमधील कंपन्यांची संख्या वाढू लागली. येथे कारखाने येण्याचे प्रमाण वाढले. साहजिकच कामगारांची मागणी वाढली. त्यामुळे परिसरातील गावांप्रमाणेच खेड व चिपळूण तालुक्यातील गावांमधील तरुणांना रोजगार मिळाला. केवळ इतकेच नाहीतर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज येथील तरुणही नोकरीसाठी या कारखान्यांमध्ये येऊ लागले. आता हा व्याप अजूनच वाढत गेला असल्याने परराज्यातील कामगारांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे या कारखान्यांनी हजारो कुटुंबांना उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे.